Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज होणार आहे.. निवड समिती प्रमुख अजित आगरकर हे पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर करतील. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठकिला सुरूवात झाली आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांचे पुनरागमन हा सर्वाधिक चर्चेचा विषय असणार आहे. पण, हाती आलेल्या बातमीनुसार KL Rahul याचे भारतीय संघात पुनरागमन लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.
फिटनेसमुळे श्रेयसबाबतची निवड समिती संभ्रमात आहे. त्यामुळे ही दोघं नाही तर कोण, हा खरा प्रश्न आहे. लोकेश राहुलवर काही महिन्यांपूर्वी उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया झाली,तर श्रेयसच्याही पाठीच्या दुखापतीवर उपचार सुरू होते. दोन्ही खेळाडू पुनरागमनासाठी कसून मेहनत घेत आहेत आणि सराव सामन्यात दोघांनी सहभागही घेतला. पण, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नितीन पटेल हे काय फिटनेस रिपोर्ट देतात त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहचा फिटनेस रिपोर्ट दिला अन् आता भारतीय गोलंदाज आयर्लंड दौऱ्यावर नेतृत्व करतोय. पण, राहुल व श्रेयस ५० षटकांचा सामना खेळू शकतील एवढे फिट झालेत का?
दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांना मैदानावर उतरवण्याची कोणतीच घाई निवड समिती करू इच्छित नाही. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत ही दोन नावं न दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. यापूर्वी जसप्रीतला घाईघाईत खेळवण्याची चूक झाली होती आणि त्यामुळे प्रमुख गोलंदाज आशिया चषक, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अन् जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला मुकला होता.
राहुल व श्रेयस यांच्याजागी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि संजू सॅमसन यांची नावं चर्चेत आहेत. संजूने काल आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२०त दमदार खेळ केला होता. सूर्याचे ट्वेंटी-२०तील आकडे चांगले असले तरी वन डेत तो अपयशी ठरला आहे. रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांच्यासह कुलदीप यादवची निवड निश्चित मानली जात आहे. वॉशिंग्टन सुंदरचेही नाव चर्चेत आहे आणि त्याची निवड झाल्यास युझवेंद्र चहलला बाकावर बसावे लागेल.