नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार ९ वाजता खेळपट्टीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे पावसाची बॅटिंग कायम राहिली तर सामना अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे.
तत्पुर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच सावध खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांना पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीने सतावले. शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवून आपला इरादा स्पष्ट केला. त्यापाठोपाठ हारिस रौफने सलामीवीर शुबमन गिलला बाद केले. पण, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. अखेर भारताला संपूर्ण ५० षटके देखील खेळता आली नाहीत अन् टीम इंडिया ४८.५ षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाली.
भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक (८७) धावा केल्या, तर इशान किशनने (८२) खेळी करून पाकिस्तानसमोर सन्मानजनक आव्हान उभे करण्यात मोलाचा हातभार लावला. किशन-पांड्याने पाचव्या बळीसाठी मोठी भागीदारी नोंदवून सामन्यात रंगत आणली. या दोघांना वगळता एकाही भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.