Asia Cup 2023 PAK vs BAN Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांचा दबदबा राहिला. बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन आणि मुश्फिकर रहिम यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह विक्रमी शतकी भागीदारी करून डाव सावरला होता. पण, दोघांपैकी एकाची विकेट पडली अन् पुढील ४६ धावांत ६ फलंदाज माघारी परतले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात काही खास झाली नाही. पहिल्या १० षटकांत त्यांचे मोहम्मद नईम ( २०), मेहिदी हसन मिराझ ( ०), लिटन दास ( १६) आणि तोवहिद हृदय ( २) हे चार फलंदाज माघारी परतले. नसीम शाहने विकेटची सुरुवात करून दिली आणि त्यानंतर शाहीन आफ्रिदीने विकेट घेतली. नसीम शाह क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला अन् त्याला मैदान सोडावे लागले. त्यावेळी हॅरिस रौफला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने पहिल्या दोन षटकांत बांगलादेशला दोन धक्के दिले. ४ बाद ४७ अशा कात्रित सापडलेल्या बांगलादेशला कर्णधार शाकिब अल हसन व मुश्फिकर रहिम या अनुभवी खेळाडूंनी सावरले आहे.
मधल्या षटकांतील गोलंदाजांचे अपयश ही पाकिस्तानची कमकुवत बाजू पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शाकिब आणि रहिम हे संयमी खेळ करून सेट झाले, त्यानंतर चांगले फटके मारून धावांचा वेग वाढवल. शाकिबने ५३ चेंडूंत वन डे क्रिकेटमधील ५४वे अर्धशतक झळकावले. फहीम अश्रफने ही जोडी तोडली. शाकिब अल हसन ५७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांवर झेलबाद झाला अन् मुश्फिकर रहिमसोबत त्याची १०० धावांची भागीदारी तुटली. शमीम होसैन ( १६) याला इफ्तिखार अहमदने माघारी पाठवून बांगलादेशला सहावा धक्का दिला. त्यानंतर बांगलादेशचा डाव ३८.४ षटकांत १९३ धावांवर गडगडला. रहिमने ८७ चेंडूंत ६४ धावा केल्या. हॅरिस रौफने ४, नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या.