Asia Cup 2023 PAK vs BAN Live : आशिया चषक स्पर्धेच्या Super 4 फेरीला आजपासून सुरूवात झाली आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत रंगतेय. सामन्याच्या पहिल्या १० षटकांत पाकिस्तानने वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळतंय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने ४ फलंदाज गमावले आहेत. पण, पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी प्रमुख गोलंदाज नसीम शाह ( Naseem Shah) याच्या खांद्याला दुखापत झाली आहे आणि त्याला मैदान सोडावे लागले आहे. शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांच्यानंतर नसीम हा पाकिस्तानचा हुकूमी एक्का आहे.
वे गवान गोलंदाज नसीम शाह क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. फाइन लेग बाऊंड्रीजवळ चौकार रोखण्याच्या प्रयत्नात नसीमला दुखापत झाली. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचे समजते. आता त्याची दुखापत कितपत गंभीर आहे हे पाहावे लागेल, पण ज्या प्रकारची दृश्ये समोर आली आहेत त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला चिंता वाटू शकते. नसीम शाह हा पाकिस्तानचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे आणि शाहीन आफ्रिदीसह नवीन चेंडूची जबाबदारी सांभाळतो. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने संघाला पहिले यश मिळवून दिले.
२० वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीनच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्याने चेंडू रोखला पण तो सीमारेषेजवळ तो पडून राहिला. त्याला उठता येत नव्हते. पाकिस्तान संघाच्या फिजिओने त्याची काळजी घेतली. काही वेळ ते सीमारेषेच्या बाहेर शांतपणे बसले. नंतर तो सावकाश पावलांनी ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेला. त्याच्या उजव्या खांद्यावर ताण येण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मोहम्मद हॅरिस हा पर्याय म्हणून क्षेत्ररक्षणासाठी आला. बांगलादेशने १२ षटकांत ४ बाद ५६ धावा केल्या आहेत. नसीम, शाहीन यांनी प्रत्येकी १ तर हॅरिस रौफने दोन विकेट्स घेतल्या.