Pakistan, Asia Cup 2023: आशिया कप होणार की नाही याबाबत अद्याप काहीच स्पष्ट होत नाहीये. तशातच एका वृत्तानुसार, पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल नाकारण्यात आल्यामुळे यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया कपचे आयोजन करणे आता अशक्य आहे. आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल दिले होते, जे आशियाई क्रिकेट परिषदेच्या इतर सर्व सदस्यांनी नाकारले आहे. हे मॉडेल फेटाळल्यानंतर आता पाकिस्तान आशिया कप खेळणार नसल्याचेही बोलले जात आहे.
पाकिस्तान न खेळल्याने नुकसान कोणाचे?
आता प्रश्न असा आहे की जर पाकिस्तानने आशिया कप खेळला नाही तर त्याचे काय नुकसान होईल? आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या अनुपस्थितीमुळे ब्रॉडकास्टर्सचे बरेच नुकसान होऊ शकते. भारत-पाकिस्तान हा आशिया कपमधील सर्वात मोठा सामना मानला जातो. जगाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. या सामन्यात जाहिरातीचे पैसेही दुप्पट होतात. साहजिकच, जर भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, तेव्हा ब्रॉडकास्टर्सही या स्पर्धेतून माघार घेऊ शकतात.
पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल काय होते?
पीसीबीच्या प्रस्तावित हायब्रीड मॉडेलनुसार, पाकिस्तानने 3 किंवा 4 आशिया चषक सामने आपल्या देशात खेळायचे होते आणि भारत आपले सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशात खेळणार होता. पण बीसीसीआय यासाठी तयार नव्हते आणि श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही BCCIला पाठिंबा दिला. त्यामुळे पीटीआयच्या वृत्तानुसार, आता या स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. आता पाकिस्तानकडे दोन पर्याय आहेत की एकतर ते या स्पर्धेचे यजमानपद सोडतील किंवा स्पर्धेतूनच माघार घेतील.
पाकिस्तानशिवाय होणार चौरंगी मालिका!
आशिया चषक रद्द झाल्यास बीसीसीआय चार देशांची एकदिवसीय मालिका आयोजित करू शकते, असे वृत्त आहे. या मालिकेत बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि भारत हे संघ खेळतील. ही मालिका ५० षटकांची असेल आणि वनडे विश्वचषकाच्या तयारीसाठी ही चांगली संधी असेल. त्यातच दुसरीकडे पाकिस्तान काय करतो हे पाहणे बाकी आहे. कारण आशिया चषक न झाल्यास पाकिस्तानचा संघही भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकू शकतो. पीसीबीने यापूर्वीही असे म्हटले आहे.