Asia Cup 2023, Pakistan vs Sri Lanka Live Marathi : पाकिस्तानचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. श्रीलंकेने करो वा मरो सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. श्रीलंकेच्या गोलंदाजानंतर फलंदाजांनी कमाल करून दाखवली अन् पाकिस्तानला अक्षरशः शरणागती पत्करण्यास भाग पाडले. गचाळ क्षेत्ररक्षण, दिशाहीन गोलंदाजीने कर्णधार बाबर आजमही हैराण झाला होता आणि त्यानेही मनातून पराभव पत्करला होता. त्याच्या देहबोलीतून हे स्पष्ट जाणवत होते. इफ्तिखार अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी विकेट्स घेत पाकिस्तानच्या आशेचा किरण जागवल्या होत्या. पण, चरिथ असलंकाने २ चेंडूत ६ धावांची गरज असताना डोकं शांत ठेवून खेळ केला अन् सामना जिंकला. आता Sri Lanka vs India Final अशी फायनल रविवारी होणार आहे. श्रीलंका ११ वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे.
फखर जमान ( ४) अपयशी ठरल्यानंतर बाबर आजम ( २९)ने अब्दुल्लाह शफिकसह ६४ धावांची भागीदारी केली. शफिकने ५२ धावांची खेळी करून त्याची निवड योग्य ठरवली. पण, दुसऱ्या बाजूने विकेट्स पडल्या अन् ५ बाद १३० अशी पाकिस्तानची अवस्था झाली होती. पण, मोहम्मद रिझवानला दिलेलं जीवदान महागात पडले. रिझवान ७३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला. इफ्तिखार ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. पाकिस्तानने ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या. मथिषा पथिराणाने ३ अन् प्रमोद मदुशाने २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांत १०२ धावा चोपल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे येथे DLS अर्थात डकवर्थ लुईस नियम लागू झाला अन् त्यानुसार श्रीलंकेसमोर ४२ षटकांत २५२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.
श्रीलंकेला फुल सपोर्ट असला तरी त्यांना चौथ्या षटकात धक्का बसला. कुसर परेरा ( १७ धावा, ८ चेंडू ) रन आऊट झाला. पथूम निसंका आणि कुसल मेंडीस यांनी चांगली फटकेबाजी करून श्रीलंकेचा रन रेट पळता ठेवला होता. पण, शादाब खानने अप्रतिम रन आऊटनंतर सुरेख झेल टिपला. निसंका २९ धावांवर शादाबच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. मेंडिससह सदीरा समरविक्रमाने ४२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून श्रीलंकेला फ्रंटसीटवर ठेवले. कर्णधार बाबर पाकिस्तानी खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणावर निराश झालेला दिसला. मेंडीसने ४७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ समरविक्रमानेही चांगली खेळी केली. पाकिस्तानने आतापर्यंत पराभव मान्य केला होता.
मेंडीस आणि समरविक्रमा यांची १०० धावांची भागीदारी इफ्तिखार अहमदने तोडली. समरविक्रमा ४६ ( ५१ चेंडू) धावांवर यष्टिचीत झाला. शतकाच्या नजीक आलेल्या मेंडीसला ९१ धावांवर ( ८७ चेंडू, ८ चौकार व १ षटकार) इफ्तिखारने माघारी जाण्यास भाग पाडले. मोहम्मद हॅरिसने अफलातून झेल टिपला. आता सामना चुरशीचा होण्याच्या मार्गावर होता, कारण श्रीलंकेचे दोन्ही सेट फलंदाज माघारी परतले. इफ्तिखारने कर्णधार दासून शनाकाची ( २) विकेट काढून श्रीलंकेला मोठा धक्का दिला. धनंजया डी सिल्वा ( ५) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर दुनिथ वेल्लालेगेला भोपळ्यावर शाहीन आफ्रिदीने माघारी पाठवले. त्याने ४ धावा देत २ विकेट्स घेतल्याने शेवटच्या षटकात ८ धावा श्रीलंकेला करायच्या होत्या.
जमन खानने सुरेख गोलंदाजी करून २ चेंडू ६ धावा असा सामना आणला अन् चरिथ असलंकाला नशीबाने एक चौकार मिळाल्याने १ चेंडू २ अशी मॅच आली. असलंकाने दोन धाव घेत श्रीलंकेला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.