Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : यजमान श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये शनिवारी बांगलादेशवर विजय मिळवला. पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर ४ मध्ये प्रत्येकी १ विजय मिळवून खात्यात २ गुण जमा केले आहेत. यामुळे टीम इंडियावर फायनलसाठी दडपण वाढले आहे, तर सलग दुसऱ्या पराभवामुळे बांगलादेश अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. आता पाकिस्तान, श्रीलंका आणि भारत यांच्यात चुरस आहे.
कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा ( Sadeera Samarawickrama) यांच्या अर्धशतकांमुळे श्रीलंकेने आव्हानात्मक धावा उभ्या केल्या. पथून निसंका आणि दिमुथ करुणारत्ने ( १८) या सलामीच्या जोडीला चांगली सुरुवात करून देता आली नाही. निसंका व कुसल मेंडिस ( ४०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. मेंडिसने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ७३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह त्याने ५० धावा केल्या. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने ७२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९३ धावा केल्या. श्रीलंकेच्या ५० षटकांत ९ बाद २५७ धावा झाल्या.
प्रत्युत्तरात बांगलादेशने सातव्या क्रमांकावर येणाऱ्या मेहिदी हसन मिराझला आज सलामीला पाठवले. त्याने मोहम्मद नईमसह चांगली सुरुवात करून दिली. या दोघांची ५५ धावांची भागीदारी दासून शनाकाने तोडली. मिराझ २८ धावांवर झेलबाद झाला. लिटन दास ( १५) व कर्णधार शाकिब अल हसन ( ५) हे अपयशी ठरले. नईमही २१ धावांवर माघारी परतल्याने श्रीलंकेने सामन्यात डोकं वर काढले होते. पण, मुश्फिकर रहिम व तोवहीद हृदोय यांनी सुरेख भागीदारी रचली अन् बांगलादेशच्या आशा कायम ठेवल्या. ११२ चेंडूंतील ७२ धावांची ही भागीदारी श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने तोडली. रहीम २९ धावांवर झेलबाद झाला.
रहीमच्या विकेटने बांगलादेशवर दडपण निर्माण झालेले. हृदोय असल्याने बांगलादेशच्या आशा कायम होत्या आणि त्याने चांगला खेळही सुरू ठेवला होता. ४४व्या षटकात त्याने फ्री हिटवर मारलेला षटकार श्रीलंकेच्या प्रशिक्षकांच्या पोटात गोळा आणून गेला, परंतु पुढच्याच चेंडूवर महीश थीक्षणाने अप्रतिम चेंडूवर हृदोयला पायचीत केलं अन् सारं स्टेडियम दणाणून गेलं. हृदोयने ९७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८२ धावांची अप्रतिम खेळी केली. थीक्षणाने त्याच षटकात तस्कीन अहमदला पायचीत करून बांगलादेशला आठवा धक्का दिला. मथीशा पथिराणाने पुढे धक्के दिले अन् बांगलादेशचा संपूर्ण संघ २३६ धावांवर माघारी पाठवला. श्रीलंकेने २१ धावांनी विजय मिळवला. शनाका, थीक्षाना व पथिराणा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
Web Title: Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : Towhid Hridoy scored 82 runs, but Sri Lanka's thrilling victory, Beat BAN by 21 runs! Increased pressure on Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.