Asia Cup 2023, Super 4 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा हा सामना पाकिस्तानने ७ विकेट्स राखून जिंकला आणि आता सुपर ४ च्या उर्वरित सामन्यासाठी संघ कोलंबो येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध १० सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यापूर्वी बाबर आजमने ( Babar Azam) मोठा दावा केला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताची आघाडीची फळी ढासळून टाकली होती. इशान किशन व हार्दिक पांड्या खेळले म्हणून भारत दोनशेपार धावा करू शकला होता. आता दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत आणि यावेळी निकाल पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या सामन्याबाबत बाबर म्हणाला, मोठ्या सामन्यांचं आम्ही दडपण घेत नाही. बांगलादेशविरुद्धच्या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आम्ही नेहमीच मोठ्या सामन्यासाठी तयार असतो. भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही १०० टक्के योगदाना देणार.''
बाबारने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गोलंदाजांचे कौतुक केले. विशेषतः त्याने हॅरीस रौफ व नसीम शाह यांच्या कामगिरीचा उल्लेख केला. तो म्हणाला,''विजयाचे श्रेय हे सर्व खेळाडूंना जाते, परंतु खास करून गोलंदाजांचे कौतुक. पहिल्या १० षटकांत त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती उल्लेखनीय होती. हॅरीस रौफयाचा स्पेल अप्रतिम होता. फहीम अर्शदने चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टीवर मला गवत दिसल्याने मी अतिरिक्त जलदगती गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले.'' रौफने या सामन्यात ४, नसीमने ३ विकेट्स घेत बांगलादेशचा संपूर्ण संघ १९३ धावांत तंबूत पाठवला. त्यानंतर इमाम-उल-हक ( ७८) आणि मोहम्मद रिझवान ( ६३*) यांनी विजय मिळवून दिला.