कोलंबो - आशिया कपमधील भारत-पाक सामन्यासाठी एका तिकिटाची किंमत ४० ते ५० हजार रुपयांच्या घरात असल्याने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथ्या मुरलीधरन चांगलाच भडकला. त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीकाही केली. भारत-पाक यांच्यात रविवारी झालेल्या सुपर फोर लढतीसाठी तिकिटाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. पावसामुळे हा सामना सोमवारी अर्थात राखीव दिवशी खेळविण्यात आला. तिकिटे चढ्या दराने विकली जात असल्याने सामन्यादरम्यान मैदानात प्रेक्षकांची संख्या नगण्य होती.
‘प्रेक्षकांनी मैदानाकडे पाठ फिरविण्यास पीसीबी जबाबदार आहे. लंकेत सध्या आर्थिक आणीबाणी आहे. तिकिटांच्या किमती महागड्या आहेत. अखेरच्या क्षणी या किमती थोड्या कमी करण्यात आल्या. सहा हजारांपासून पुढील किमतीची तिकिटे कुणीही खरेदी करू शकले नाहीत. चांगल्या स्थितीत सामना पाहायचा असेल तर ४० ते ५० हजार मोजावे लागत होते. लंकेतील एका व्यक्तीचे हे एका महिन्याचे वेतन आहे. इतकी रक्कम कुणी खर्च करेल, अशी स्थिती नाही. यामुळे प्रेक्षक फिरकले नसावेत. पावसाच्या शक्यतेमुळे देखील लोकांनी जोखीम पत्करणे टाळले असावे,’ असे मुरलीधरन म्हणाला.