Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय खेळाडू बंगळुरू येथे ६ दिवसीय शिबिरात दाखल झाले आहेत. जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा हे आयर्लंड दौऱ्यावरून थेट कॅम्पमध्ये दाखल होतील. खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचणी करणे अन् बॉडिंग वाढवणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिवाय विंडीज दौऱ्यापासून विश्रांतीवर गेलेल्या खेळाडूंना १३ दिवसांचा फिटनेस प्रोग्राम दिला गेला होता आणि त्यांची Yo-Yo Test झाली आहे. विराटने १७.२ गुण मिळवत ही टेस्ट पास केली, परंतु त्याने गोपनीय बाब सार्वजनिक केल्याची चर्चा रंगली आहे. BCCI विराटच्या कृतीवर प्रचंड नाराज आहे आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या त्याला फटकारले आहे.
विराटने इंस्टाग्राम स्टोरीवरून Yo -Yo टेस्टचा निकाल जाहीर केला आणि त्याची हिच कृती संघ व्यवस्थापनाला आवडली नाही. त्यांनी लगेचच भारतीय खेळाडूंना त्यांच्या फिटनेस टेस्टचा निकाल सार्वजनिक करू नका अशा सूचना दिल्या आहेत. BCCI च्या कार्यकारिणी सदस्यांना विराटचे हे वागणे आवडलेले नाही. ही गोपनीय माहिती असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे त्यांनी विराटलाही फटकारले असल्याचे वृत्त आहे. इंडियन एस्क्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सर्व खेळाडूंना बीसीसीआयने त्यांचे म्हणणे सांगितले आहे.
“सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतीही गोपनीय बाब पोस्ट करू नये यासाठी खेळाडूंना तोंडी माहिती देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान ते फोटो पोस्ट करू शकतात परंतु यो यो टेस्टचे गुण पोस्ट केल्याने कराराच्या कलमाचा भंग होतो,” असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र, भारतीय क्रिकेटपटू नॉन-स्टॉप क्रिकेट खेळत असल्याने अंतिम गुण बदलू शकतात. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंनी निवडलेल्या फिटनेस मानकांचे किमान पालन करणे आवश्यक आहे. १३ दिवसीय फिटनेस प्रोग्राम पूर्ण केलेल्या खेळाडूंना श्रीलंकेत आशिया कप २०२३ पूर्वी रक्त तपासणीसह संपूर्ण शरीराची तपासणी केली जाईल. BCCI वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे प्रशिक्षक त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी करतील आणि जो कोणी आवश्यकता पूर्ण करत नाही त्यांना बाहेर काढले जाईल.