आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. सुपर-४ च्या आपल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला दोन विकेट्सनी नमवून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत श्रीलंकेने पाकिस्तानला घरची वाट दाखवली होती. दरम्यान, अंतिम लढतीपूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू महीश तीक्षणा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे.
महीश तीक्षणा पावसाच्या अ़डथळ्यामुळे खेळ थांबवून सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर ३५ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. तेव्हा त्याला चालायला त्रास होत होता. तो लंगडत होता. त्याने कसंबसं षटक पूर्ण केलं. मात्र ३९ व्या षटकात त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. तीक्षणा याने या सामन्यात ९ षटकांत ४२ धावा देऊन १ विकेट टिपला होता.
आता वर्ल्डकप तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकन क्रिकेट व्यवस्थापन तीक्षणाबाबत कुठलीही जोखीम घेऊ इच्छिणार नाही. अशा परिस्थितीत भारताविरोधात तो अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. श्रीलंकेचा संघ दुखापतींमुळे आधीच त्रस्त आहे. वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळू शकलेला नाही,
महीश तीक्षणाला झालेल्या दुखापतीबाबत श्रीलंकन क्रिकेट संघटनेकडून माहिती देण्यात आली आहे. त्यात सांगितलं आहे की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महीश तीक्षणाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या दुखापतीची समीक्षा करण्यासाठी शुक्रवारी त्याचं स्कॅन करण्यात येईल.