कोलंबो, आशिया चषक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : भारत आणि बांगलादेश यांच्यातील आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. भारताचा डाव 106 धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेश सहज विजय मिळवून आशिया चषक नावावर करेल असा अंदाज होता. पण, भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना बांगलादेशची कोंडी केली. भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठू दिला नाही. पण, बांगलादेशने जिद्द सोडली नाही आणि अखेरपर्यंत खिंड लढवली. मात्र, अवघ्या 5 धावांनी त्यांना जेतेपदानं हुलकावणी दिली. भारतानं हा सामना जिंकून सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मुंबईकर अथर्व अंकोलेकरने 28 धावांत पाच विकेट्स घेतल्या.
बस कंडक्टर माऊलीचा मुलगा भारताच्या युवा क्रिकेट संघात
अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुवेश पारकर ( 4), अर्जुन आझाद ( 0) आणि तिलक वर्मा ( 2) हे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या 8 धावांत माघारी परतले. त्यानंतर कर्णधार ध्रुव जुरेल ( 33) आणि शास्वत रावत ( 19) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु टीम इंडियानं पुन्हा लोटांगण घातले. करण लाल ( 37) याने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. भारताचा संपूर्ण संघ 32.4 षटकांत 106 धावांत तंबूत परतला. बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरी ( 3/18) आणि शमीम होसैन ( 3/8) यांनी टीम इंडियाचे कंबरडे मोडले.
भारताच्या या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचीही तारांबळ उडाली. आकाश सिंग आणि अथर्व अंकोलेकर यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. बांगलादेशचे चार फलंदाज 16 धावांत माघारी परतले होते. कर्णधार अकबर अलीनं चिवट खेळ करताना ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु अथर्वनं त्याला बाद करत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. बांगलादेशचे सहा फलंदाज दुहेरी आकडा न गाठताच माघारी परतले. त्यापैकी दोन फलंदाजांना तर भोपळाची फोडता आला नाही. गोलंदाजीत कमाल करणाऱ्या बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरीनं फलंदाजीतही बहुमुल्य योगदान दिले. त्यानं 21 धावा केल्या. बांगलादेशची अवस्था 8 बाद 78 असताना भारताचा विजय पक्का समजला जात होता. पण, तनझीब हसन सकीब व रकिबुल हसन यांनी कडवा संघर्ष केला. या दोघांनी 23 धावांची भागीदारी केली. पण, त्यांनाही अपयश आले. बांगलादेशचा संपूर्ण संघ 101 धावांत माघारी परतला.
Web Title: Asia Cup : Defending champions India beat Bangladesh in thrilling final; lift ACC U19 Asia Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.