Setback to Sri Lanka, IND vs SL Asia Cup Final : भारताविरूद्ध श्रीलंकेचा संघ रविवारी आशिया चषक २०२३ चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. आशिया कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी (17 सप्टेंबर) होणार आहे. या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू महिश तिक्षणा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे. गुरुवारी पाकिस्तान विरुद्धच्या सुपर 4 च्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना तीक्षणाच्या उजव्या पायाच्या स्नायूंवर ताण येऊन तो दुखापतग्रस्त झाला होता.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान तीक्षणा अनेकवेळा लंगडून चालताना दिसला, त्यानंतर त्याने मैदान सोडले होते. दुखापत असूनही त्याने 42 षटकांच्या सामन्यात नऊ षटकांची स्पेल पूर्ण केली. त्याने 42 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. पण अखेर पाकिस्तानच्या डावाच्या 39व्या षटकात तो मैदानाबाहेर गेला. श्रीलंकेने 'करा यो मरो' सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिक्षणाच्या दुखापतीने श्रीलंकेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दासून शनाकाच्या श्रीलंकन संघाचे अनेक दमदार खेळाडू जखमी झाले आहेत. वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू मदुशंका आणि लाहिरू कुमारा यांसारखे महत्त्वाचे खेळाडू दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. पण हे खेळाडू २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे.