आशिया चषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (17 सप्टेंबर) होणार आहे. एकीकडे श्रीलंका आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरीकडे भारताला विश्वचषकापूर्वी मोठी स्पर्धा जिंकून सकारात्मकता मिळवायची आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंसाठी हा सामना खूप खास असणार आहे. हे दोन खेळाडू म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा. या दोघांच्या बाबतीत तब्बल 13 वर्षांनंतर एक खास योगयोग जुळून येणार आहे.
विराट - रोहित 13 वर्षांनंतर एकत्र
2018 नंतर प्रथमच आशिया चषक वन डे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने शेवटचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्माने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. पण विराट कोहली त्या संघाचा भाग नव्हता. त्याला विश्रांती देण्यात आली होती. विराट कोहली वन डे फॉरमॅटमधील शेवटची आशिया कप फायनल 2010 मध्ये खेळला होता. त्यावेळी रोहित शर्मादेखील संघाचा भाग होता. आता तब्बल १३ वर्षांनंतर रोहित आणि विराट एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आशिया कपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहेत.
दरम्यान, आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात नेपाळचा १० गडी राखून पराभव केला. यानंतर पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव झाला. यानंतर श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. पण सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशकडून भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या सामन्यात टीम इंडियाने आपल्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे आज संघ सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन मैदानात उतरेल हे नक्की.