दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसन यांनी आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध एक विक्रम नोंदवला. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धची सलामीवीरांची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 20.5 षटकांत 120 धावांची भागीदारी केली. भागीदारीचे हे इमले रचताना त्यांनी अनेक विक्रम मोडले. बांगलादेशच्या सलामीवीरांनी भारताविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. पण त्यांना पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज व नासीर जमशेद यांचा 224 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडता आला नाही. हाफिज व जमशेद यांनी 2012च्या आशिया चषक स्पर्धेत ही खेळी साकारली होती.
आशिया चषक स्पर्धेतील सलामीवीरांची ही 14वी सर्वोत्तम भागीदारी ठरली. याही विक्रमात पाकिस्तानची हाफिज व जमशेद आघाडीवर आहे. बांगलादेशच्या सलामीवीरांनी नोंदवलेली आशिया चषक स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. हा विक्रम अनामुल हक आणि इम्रुल कायेस यांच्या नावावर आहे. त्यांनी 2014 च्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 150 धावांची सलामी दिली होती.