Mystery Man, India vs Sri Lanka Asia Cup 2023 Final: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने रविवारी कोलंबोमध्ये इतिहास रचला. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आणि सर्वाधिक आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. या दरम्यान, आशिया कप ट्रॉफीसोबत एक मिस्ट्री मॅन दिसला. तो नक्की कोण, जाणून घेऊया.
टीम इंडियाने 2018 नंतर प्रथमच आशिया चषकाची अंतिम फेरी जिंकली. विशेष म्हणजे त्यावेळीही रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत होता. आताही त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि भारतीय संघाला आठव्यांदा ट्रॉफी जिंकवून दिली. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या एकतर्फी सामन्यात भारताने श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर ऑलआउट केले, त्यानंतर ६ षटकांत लक्ष्य गाठले. भारताने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला. सामन्यानंतर बक्षीस समारंभात कर्णधार रोहितने ६ बळी घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे कौतुक केले. पण ट्रॉफी उंचावणारा माणूस कुणीतरी वेगळाच होता.
कोण आहे 'मिस्ट्री मॅन'
आशिया चषक जिंकल्यानंतर, जेव्हा भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य ट्रॉफीसह आनंद साजरा करत होते, तेव्हा रोहित शर्माने आणखी एका व्यक्तीला मंचावर बोलावले. त्यानंतर त्याला ट्रॉफी देण्यात आली. टीव्हीवर आणि स्टेडियममध्ये बसलेले लोक शोधण्याचा प्रयत्न करू लागले की हा मिस्ट्री मॅन कोण आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट डी राघवेंद्र (D Raghavendra) उर्फ रघु आहे. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणजेच फलंदाजांना नेट्समध्ये सराव करताना चेंडू फेकणारा व्यक्ती.
राघवेंद्र अनेक वर्षांपासून भारतीय संघासोबत आहे. 2011 मध्ये, रघू पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर थ्रोडाउन स्पेशालिस्ट म्हणून दिसला होता. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यासाठी तो भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये परतला आणि तेव्हापासून तो भारतीय संघाचा भाग आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सूचनेवरून त्याला 'थ्रोडाउन स्पेशालिस्ट' म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते. या दोघांनी बंगळुरूमधील एनसीएमध्ये रघूच्या थ्रोडाउनचा सामना केला होता.