दुबई : सलामीच्या लढतीत कडव्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव करताच आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज बुधवारी दुसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी फलंदाजी क्रमात बदल करणे आणि संघ संयोजन तपासणे असा प्रायोगिक स्वरूपाचा असेल.
लोकेश राहुलसारख्या फलंदाजासाठी लय कमविण्याची ही मोठी संधी असेल. रोहित शर्माच्या संघासाठी हा सामना नेट सरावासारखा राहील. निजाकत खान याच्या नेतृत्वाखालील हाँगकाँग संघात भारत आणि पाकिस्तानी वंशांच्या खेळाडूंचा भरणा आहे. या खेळाडूंना दोन्ही देशांतील प्रथमश्रेणी संघातही स्थान मिळू शकले नसते. हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पाकला नमविणारा भारत दुसऱ्या लढतीत फलंदाजीचा मनसोक्त सराव करण्याच्या विचारात असावा. राहुलला पाकविरुद्ध सूर गवसला नव्हता. आता किमान हाँगकाँगविरुद्ध मोठी खेळी करीत ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकासाठी त्याने सज्ज व्हावे, असे संघ व्यवस्थापनाला वाटते.
हाँगकाँगकडे पाकिस्तानसारखे भेदक गोलंदाज नाहीत, तरीही त्यांना सहज लेखण्याची चूक करता येणार नाही. एखाद्या नवख्या संघाच्या कामगिरीबाबत कुणीही भाकीत करू शकत नाही. रोहितने प्रयोग करण्याचे संकेत दिले असल्याने फलंदाजी क्रमात बदल झाल्यास फार आश्चर्य वाटू नये.
विराटसारख्या खेळाडूलादेखील हा सामना लय गवसण्यास उपयुक्त ठरावा. पाकविरुद्ध विशेष कामगिरी न करू शकलेला रोहितदेखील या सामन्याद्वारे फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. रवींद्र जडेजाला चौथ्या स्थानावर पाठविले जाईल की दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला खेळविले जाईल, याची उत्सुकता आहे.
पाक संघात शाहीन आफ्रिदी नसताना भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली होती. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक खेळण्याची रणनीती यशस्वी व्हायची असेल तर आघाडीच्या फळीला लवकरात लवकर सूर गवसणे क्रमप्राप्त आहे. युझवेंद्र चहल आणि जडेजा यांना विश्रांती देत रविचंद्रन अश्विन आणि रवी बिष्णोई यांना खेळविले जाण्याची दाट शक्यता आहे.
विराटने गाळला घाम
आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३५ धावांची खेळी करणारा दिग्गज विराट कोहली बुधवारी हॉंगकॉंगविरुद्ध कसा खेळतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दीर्घकाळ आऊट ऑफ फॉर्म असलेला विराट दुसऱ्या सामन्यात यापेक्षा मोठी खेळी करण्यास सज्ज झाला असून सामन्याआधी त्याने वर्कआऊटदरम्यान चांगलाच घामही गाळला. आपली ही तयारी त्याने ट्विटरवर शेअर केली.
Web Title: Asia Cup, India vs Hong kong: Batting order, focus on team composition, Team India will experiment against Hong Kong
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.