Asia Cup Indian Team Announced : आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात नवी दिल्ली येथे बैठक झाली आणि त्यानंतर संघ जाहीर केला गेला. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांचे संघात पुनरागमन झाले आहेत. उजव्या मांडीवरील शस्त्रक्रियेनंतर लोकेश राहुल संघात पुनरागमन करतोय, परंतु त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण करणारं विधान निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्याकडून आले आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर नेपाळ ( ४ सप्टेंबर)विरुद्ध भारत खेळेल. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे दोघंही तंदुरुस्त असल्याचा अहवाल NCA ने सादर केला असल्याने भारताला आनंदवार्ता मिळाली आहे. लोकेश राहुलवर यष्टिरक्षक-फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.
अजित आगरकर म्हणाला,''लोकेश राहुल आधीच्या दुखापतीतून सावरला आहे, परंतु सध्या त्याला तुरळक दुखापत झाली आहे. त्यामुळेच संजू सॅमसनचा राखीव यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. राहुल पहिल्या सामन्यासाठी फिट होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर तसे न झाल्यास, तो दुसरा किंवा तिसरा सामना नक्की खेळेल. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.''