सिलहट: आतापर्यंत एकतर्फी विजय नोंदविणारा भारतीय महिला संघ आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शनिवारी श्रीलंकेला नमवून विक्रमी सातवे जेतेपद मिळविण्यास सज्ज आहे. सामना दुपारी १ वाजेपासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत भारताने राखीव खेळाडूंच्या बळावरही विजय साजरे केले. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी खूप योगदान न देऊनही भारताला विजय मिळाले. हरमनने चार सामन्यात ८१ धावा केल्या तर स्मृती तीन सामने खेळली. ज्युनियर खेळाडूंनी दडपणाची स्थिती योग्यपणे हाताळली. १८ वर्षांंची शेफाली वर्मा हिने १६१ धावा केल्या शिवाय तीन गडी बाद केले. २२ वर्षांच्या जेमिमा रॉड्रिग्जने २१५ धावा केल्या. २५ वर्षांच्या दीप्ती शर्माने ९४ धावा केल्या. शिवाय १३ गडी बाद केले आहेत.
भारताला एकमेव पराभव पत्करावा लागला तो पाकिस्तानकडून. भारताला याचा वचपा काढण्याची संधी मिळू शकली नाही. मात्र उपांत्य सामन्यात श्रीलंकेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला.
फायनलमध्ये भारतीय संघ भक्कम वाटतो. लंकेची एकमेव फलंदाज ओशादी रणसिंघे हिने शंभरच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शिवाय हर्षिता मडावी (२०१ धावा) आणि नीलाक्षी डी सिल्वा (१२४) यांनी स्पर्धेत शंभरावर धावा केल्या. अनुभवी चमारी अटापट्टूच्या ९६ धावा आहेत. लंकेला मात्र कमी लेखण्याची चूक भारतीय खेळाडूंनी करू नये. चार वर्षांआधी मलेशियात बांगलादेशने भारताला चकित करून जेतेपदाची माळ गळ्यात घातली होती. फायनल खेळताना हरमनच्या संघाला नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"