कोलंबो - भारतीय संघाने एकतर्फी झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २२८ धावांनी फडशा पाडला. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस रंगलेला हा सामना विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचे नाबाद शतक आणि कुलदीप यादवच्या फिरकीने गाजला. भारतीय संघ आता मंगळवारी गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध भिडेल.
भारताने ५० षटकांत २ बाद ३५६ धावा केल्यानंतर पाकिस्तानला ३२ षटकांत १२८ धावांत गुंडाळले. धावांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्वांत मोठा विजय मिळवला. याआधी भारताने २००८ साली मिरपूर येथे पाकला १४० धावांनी नमवले होते. दुखापतीमुळे नसीम शाह आणि हॅरीस रौफ हे फलंदाजीस न उतरल्याने ८ बळी गेल्यानंतर पाकचा पराभव निश्चित झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची अडखळती सुरुवात झाली. ११ षटकांनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने सामना सुमारे सव्वा तास थांबला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले. कुलदीप यादवने पाकची जबरदस्त फिरकी घेताना २५ धावांत ५ बळी घेतले. हार्दिक पांड्याने ११व्या षटकात कर्णधार बाबर आझमला अप्रतिम त्रिफळाचीत करत पाकचे मानसिक खच्चीकरण केले.
पाकचा अर्धा संघ ९६ धावांमध्ये बाद करत भारताने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. त्याआधी, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी तडाखेबंद नाबाद शतक झळकावत पाकिस्तानची भेदक गोलंदाजी फोडली. रविवारी जोरदार पावसामुळे थांबविण्यात आलेला सामना सोमवारी मैदान ओलसर राहिल्याने उशिराने सुरू झाला. भारताने २ बाद १४७ धावांवरून सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला चढवला. कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा, तर राहुलने १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षट्कारांसह नाबाद १११ धावांचा तडाखा दिला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १९४ चेंडूंत नाबाद २३३ धावांची भागीदारी करत पाक गोलंदाजांची हवा काढली.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली-राहुल यांनी तिसऱ्या गड्यासाठी भारताकडून सर्वोत्तम नाबाद २३३ धावांची भागीदारी नोंदवली.- विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत पाचवे शतक झळकावताना श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. सनथ जयसूर्या (६) अव्वल स्थानी.- विराट कोहलीने सर्वांत वेगवान ५६१व्या डावात ७७ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा (५९३) विश्वविक्रम मोडला.- विराट कोहली-लोकेश राहुल यांनी नाबाद २३३ धावांची आशिया चषकातील सर्वोत्तम भागीदारी नोंदवताना पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिझ-नासिर जमशेद यांचा २२४ धावांचा विक्रम मोडला.- विराट कोहली-लोकेश राहुल यांनी भारत-पाकिस्तान एकदिवसीय लढतीतील सर्वोत्तम भागीदारी नोंदवताना नवज्योतसिंग सिद्धू-सचिन तेंडुलकर (२३१) यांचा विक्रम मोडला.- विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७व्यांदा नाबाद शतक झळकावले. सचिन तेंडुलकर (१५) दुसऱ्या स्थानी.- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करणारा कोहली पाचवा फलंदाज ठरला.
भारताकडून तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांकडून एकदिवसीय शतकेराहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर वि. केनिया - १९९९, ब्रिस्टॉलगौतम गंभीर आणि विराट कोहली वि. श्रीलंका - २००९, कोलकाताविराट कोहली आणि लोकेश राहुल वि. पाकिस्तान - २०२३, कोलंबो
- भारतीयांनी ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी करताना पाकिस्तानविरुद्ध १३व्यांदा शतकी सलामी दिली.- आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माने ११व्यांदा ५० हून अधिक धावांची खेळी केली. श्रीलंकेचा कुमार संगकारा (१२) अव्वल स्थानी.- सलामीवीर म्हणून भारताकडून ३०० सामने खेळणारा रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर (३४६) आणि वीरेंद्र सेहवाग (३२१) यांच्यानंतरचा केवळ तिसरा फलंदाज ठरला.- भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी एकदिवसीय सामन्यात चौथ्यांदा ५०हून अधिक धावा करण्याची कामगिरी केली.- भारताने सर्वाधिक १६व्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीनशेहून अधिक धावा काढल्या.- भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५व्यांदा ३५० किंवा त्याहून अधिक धावसंख्या रचली. दक्षिण आफ्रिका (२८) दुसऱ्या स्थानी.- भारताने पाकविरूद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सांघिक धावसंख्येशी बरोबरी साधली. याआधी भारताने २००५ ला विशाखापट्टणम येथे पाकविरूद्ध ९ बाद ३५६ धावा उभारल्या होत्या.- लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण केला.- पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ५ बळी घेणारा कुलदीप यादव केवळ तिसरा भारतीय ठरला. याआधी, अर्शद आयूब (५/२१, ढाका) आणि सचिन तेंडुलकर (५/५०, कोची) यांनी असा पराक्रम केला होता.
कोहलीच्या १३,००० धावाविराट कोहलीने सर्वांत कमी २६७ एकदिवसीय डावांत १३ हजार धावा पूर्ण करताना सचिन तेंडुलकरचा (३२१) विश्वविक्रम मोडला. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३ हजार धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय ठरला. यासह आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये कोहलीने पाचवे स्थान पटकावले असून सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये हा पल्ला गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे.- विराट कोहलीने कोलंबोमध्ये सलग चौथे शतक झळकावले.सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकेसचिन तेंडुलकर - ४९विराट कोहली - ४७रिकी पाँटिंग - ३० रोहित शर्मा -३०
रोहित-कोहलीने केले कौतुकभारत-पाकिस्तान सामना सुरळीतपणे पार पडण्यासाठी मैदान कर्मचाऱ्यांनी कठोर मेहनत घेतली. दोन दिवस रंगलेल्या या सामन्यात मैदान कर्मचाऱ्यांनी मैदान सुस्थितीत आणण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सर्व मैदान कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
धावफलक भारत : रोहित शर्मा झे. फहीम गो. शादाब ५६, शुभमन गिल झे. सलमान गो. आफ्रिदी ५८, विराट कोहली नाबाद १२२, लोकेश राहुल नाबाद १११. अवांतर - ९. एकूण : ५० षटकांत २ बाद ३५६ धावा. बाद क्रम : १-१२१, २-१२३. गोलंदाजी : शाहीन शाह आफ्रिदी १०-०-७९-१; नसीम शाह ९.२-१-५३-०; फहीम अश्रफ १०-०-७४-०; हॅरीस रौफ ५-०-२७-०; शादाब खान १०-१-७१-१; इफ्तिखर अहमद ५.४-०-५२-०.
पाकिस्तान : फखर झमान त्रि. गो. कुलदीप २७, इमाम उल हक झे. शुभमन गो. बुमराह ९, बाबर आझम त्रि. गो. हार्दिक १०, मोहम्मद रिझवान झे. राहुल गो. शार्दुल २, आगा सलमान पायचीत गो. कुलदीप २३, इफ्तिखर अहमद झे. व गो. कुलदीप २३, शादाब खान झे. शार्दुल गो. कुलदीप ६, फहीम अश्रफ त्रि. गो. कुलदीप ४, शाहीन शाह आफ्रिदी नाबाद ७. नसीम शाह दुखापतग्रस्त, हॅरीस रौफ दुखापतग्रस्त. अवांतर - १७. एकूण : ३२ षटकांत सर्व बाद १२८ धावा. गोलंदाजी : जसप्रीत बुमराह ५-१-१८-१; मोहम्मद सिराज ५-०-२३-०; हार्दिक पांड्या ५-०-१७-१; शार्दुल ठाकूर ४-०-१६-१; कुलदीप यादव ८-०-२५-५; रवींद्र जडेजा ५-०-२६-०.