नवी दिल्ली : श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमुळे आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यूएईला स्थानांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी रविवारी ही माहिती दिली.
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची अवस्था सध्या हलाखीची आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर पण गंडांतर येण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना डिसिल्वा म्हणाले, आशिया चषक यूएईला जाण्याची शक्यता जास्त आहे. मात्र पूर्वनियोजित वेळेनुसारच ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या दरम्यान खेळविली जाईल.
या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी२० प्रकारामध्ये खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय आशियाई क्रिकेट परिषद लवकरच जाहीर करू शकते.