Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धा आयोजनाच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान दौऱा करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानला मिळालेलं यजमानपद आता संयुक्त अरब अमिरातीकडे जाण्याची चिन्हे आहेत. भारताच्या या भूमिकेवर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने जहरी टीका केली आहे. आशिया चषकाच्या आयोजनाबाबत दोन दिवसांपूर्वी बहरीन येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांची बैठक पार पडली. यात बीसीसीआयचे सचिव व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह हेही उपस्थित होते. त्यांनी पाकिस्तान दौरा करणार नसल्याची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली. त्यात आता जावेद मियाँदादने उडी घेतली आहे. भारत क्रिकेट चालवत नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) या प्रकरणी मध्यस्थी करावी, असे मियाँदाद म्हणाले आहेत. ''मै तो पेहले भी कहा था, अगन नही आना तो भाड मे जाए! ( भारतीय संघाला यायचं नाही तर त्यांनी खड्ड्यात जावं. आम्हाला काही फरक पडत नाही). या गोष्टी आयसीसी हाताळू शकत नसतील तर ICC काहीच कामाची नाही. सर्व देशांसाठी एकच नियम असायला हवा. मग तो संघ कितीही ताकदवान असो, तो येत नसेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यांनी ठेका नाही घेतला आहे. या आणि खेळा, पळता कशाला?''
''भारत पाकिस्तानसोबत खेळायला का घाबरतो? त्यांना माहित्येत की, पाकिस्तानकडून पराभूत झाल्यास, तेथील जनता त्यांना सोडणार नाही. नरेंद्र मोदी यांनाही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, लोकं त्यांना सोडणार नाहीत,''अशी आक्षेपार्ह टीकाही मियाँदादने केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"