आशिया कपच्या अंदाजे शेड्यूलची घोषणा झाली आहे. ३१ ऑगस्टला ही स्पर्धा सुरु होणार आहे, ती १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाईल. पाकिस्तानात चार तर ९ सामने श्रीलंकेत खेळविले जाणार आहेत.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ यांच्यात एकूण १३ वन डे सामने होणार आहेत. या संघांची दोन गटांत विभागणी केली जाणार आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यातून फायनलचे दोन संघ ठरतील.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एसीसीने हायब्रिड मॉडेलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली, त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. मला जराही आश्चर्य वाटत नाही कारण भारताने जाण्यास नकार दिला आणि ते जात नाहीत. पाकिस्तानही विश्वचषक स्पर्धा खेळण्यास भारतात येईल, यात काही शंका नाही, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
पाकिस्तानला काय तो यजमानपदाचाच आनंद घेता येणार आहे. कारण पाकिस्तानात जे सामने होणार त्याचा अंदाज घेतला असता त्यातील एकाच सामन्यात पाकिस्तानला स्वत:च्या देशात खेळता येणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार आहेत. यावरुनही आकाश चोप्राने पाकिस्तानला टोला लगावला आहे. पाकिस्तानशिवाय आशिया चषक खेळणं म्हणजे 'टॉपिंगशिवाय पिझ्झा' असल्यासारखं आहे, असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
दरम्यान, आशिया कपमधील ग्रुप स्टेजशिवाय सुपर ४ मधील कोणतेही सामने पाकिस्तानात होणे कठीण आहे. कारण पहिल्या फेरीतील सामने फिक्स असतात. परंतू, सुपर फोरमध्ये कोण जाईल, कसा जाईल हे आताच सांगणे कठीण असते. यामुळे पाकिस्तानात हे सामने खेळविले जाणार नाही. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर श्रीलंकेने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानला केवळ दोनदाच ही स्पर्धा जिंकता आली आहे.