कोलंबो - दुखापतग्रस्त खेळाडूंनी त्रस्त असलेला पाकिस्तान आणि गतविजेता श्रीलंका आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी गुरुवारी एकमेकांचा सामना करतील. दोन्ही संघांचे २-२ गुण असून, हा सामना उभय संघांसाठी ‘करो किंवा मरो’ असाच असेल.
पाकिस्तानला वेगवान गोलंदाज नसीम शाह या श्रीलंकेविरुद्ध खेळू शकणार नसल्याने मोठा धक्का बसला आहे. खांदा दुखावल्याने नसीम आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकने त्याच्या जागी जमान खान याची संघात निवड केली.
गुरुवारी विजय मिळविणारा संघ रविवारी भारताविरुद्ध जेतेपदासाठी खेळेल. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या खेळण्यावरही शंका आहे. त्याच्या जागी पाकने शाहनवाज दहानीची निवड केली. तो १५० किमी ताशी वेगवान मारा करू शकतो. पाकचे फलंदाजही अपेक्षित कामगिरी करू शकले नसल्याने त्यांच्यावर मोठी जबाबादारी असेल.
बांगलादेशला नमविल्यानंतर भारताला कडवे आव्हान देणाऱ्या श्रीलंकेने काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही दमदार कामगिरी केली. स्पर्धा सुरू होण्याआधी वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमीरा आणि लाहिरू कुमारा दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे लंकेचा युवा संघ खेळविण्यात येत आहे. दुनिथ वेल्लालगे, मथीशा पथिराना आणि महीश तीक्ष्णा यांनी प्रभावी कामगिरी करीत संघाला संभाव्य दावेदार बनविले. गोलंदाजीत कासून रजिता हा भेदक ठरू शकलेला नाही. त्याला चार सामन्यात केवळ चारच बळी घेता आले. फिरकीपटूंनी मात्र भारतीय गोलंदाजांना त्रस्त केले होते. खेळपट्टी फिरकीला पूरक असल्याने दोन्ही संघ संथगती गोलंदाजांना प्राधान्य देतील, अशी शक्यता आहे.