भारतीय क्रिकेट संघ आशियाई कप खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. परंतू, पाकिस्तानात आशिया कप होणार नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब होत असल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास कंगाल झालेल्या पाकिस्तानच्या हातून आशिया कप निसटणार आहे.
आशियाई क्रिकेट परिषद पाकिस्तानऐवजी दुसऱ्या ठिकाणी आशिया कप खेळविण्याचा विचार करत आहे. यावर पुढील महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांच्यात आज बहरीनमध्ये महत्वाची बैठक झाली. यामध्ये कंगाल झालेला पाकिस्तान आणि आशिया कपचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली.
आशिया चषक यूएई किंवा श्रीलंकेत आयोजित केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. यंदा सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. परंतू, एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे ऑक्टोबरमध्ये म्हटले होते. यामुळे पीसीबीचे माजी अध्यक्ष खवळले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये आशिया चषक होणार की नाही यावरून चर्चा रंगली होती.
आता वेगळेच कारण समोर येत आहे. आशिया चषक हा संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील तीन ठिकाणे दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे आयोजित केला जाऊ शकतो. परंतु हा निर्णय तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान भिकेला लागला आहे. पाकिस्तानी रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण सुरु आहे. एका डॉलरला २५० पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहेत. अशा स्थितीत तेथे ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी एसीसीला मोठा खर्च करावा लागणार आहे, असा युक्तीवाद केला जात आहे.
या बैठकीला आशियाई क्रिकेट परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते. एसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकात पाकिस्तानला यजमान म्हणून दाखविले नाही, या पाकिस्तानच्या तक्रारीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती. जय शाह देखील पाकिस्तानात आशिया चषक न होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या वर्षी आशिया चषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता. कतारनेही ही स्पर्धा आयोजित करण्यात रस दाखवला आहे. मात्र कतारला ते मिळण्याची शक्यता कमी आहे.