india vs nepal cricket match 2023 : सध्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगला आहे. आज झालेल्या सामन्यात भारताच्या अ संघाने नेपाळचा दारूण पराभव करत मोठा विजय संपादन केला. भारताने ९ गडी राखून नेपाळचा पराभव करत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळचा संघ ३९.२ षटकांत अवघ्या १६७ धावांत आटोपला. निशांत सिंधूने सर्वाधिक चार बळी घेत नेपाळच्या फलंदाजांना चीतपट केले.
भारताचा मोठा विजय
भारताकडून निशांत सिंधूने सर्वाधिक चार बळी घेतले, तर राजवर्धन हंगरगेकर (३), हर्षित राणा (२) आणि मानव जगदुसाकुमार सुथारला (१) बळी घेण्यात यश आले. नेपाळच्या संघाने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी अप्रतिम खेळी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २२.१ षटकांत केवळ एक गडी गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. भारताच्या युवा शिलेदारांनी नेपाळने दिलेले १६८ धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले. भारत अ संघाकडून अभिषेक शर्माने ६९ चेंडूत ८७ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि २ षटकार ठोकले. याशिवाय साई सुदर्शनने ५२ चेंडूत ५८ धावांची संयमी खेळी केली. तसेच ध्रुव जुरेल १२ चेंडूत २१ धावा करून नाबाद माघारी परतला.
भारताची उपांत्य फेरीत धडक
१६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सांघिक खेळी केली. सलामीवीर साई सुदर्शन नाबाद (५८) आणि अभिषेक शर्मा (८७) यांच्या सलामी जोडीने भारताला विजय मिळवून दिला. तर यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने २१ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह भारत अ संघाने इमर्जिंग आशिया चषक २०२३ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ जुलैला भारतीय संघ पाकिस्तान अ संघाशी भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे.
Web Title: Asia Emerging Cup 2023 india vs nepal match Abhishek Sharma's knock of 87 runs has led the Indian team to win by 9 wickets and enter the semi-finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.