जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारताची महिला थाळीफेकपटू सीमा पुनियाने आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. सीमाने सामाजिक भान राखताना केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. आशियाई स्पर्धेच्या 12व्या दिवशी सीमाने आशियाई स्पर्धेसाठी मिळालेला जवळपास 50 हजारांचा भत्ता आणि स्वतःकडील एक लाख रुपये केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणाली,“मला मिळालेला भत्ता आणि स्वतःकडील एक लाख रुपये मी केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतः तिथे जाऊन केरळमधील जनतेला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या अन्य खेळाडूंनीही भत्त्यातील किमान निम्मी रक्कम केरळ पूरग्रस्तांना द्यावी, अशी मी विनंती करते.”
डाव्या पायाच्या दुखापतीनंतरही सीमाने स्पर्धा पूर्ण केली आणि कांस्यपदक जिंकले. तिने 61.03 मीटर थाळी फेक करून कांस्यपदक निश्चित केले.