नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधीकरणामध्ये तो सहाय्यक प्रशिक्षक होता. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला, त्यामुळे त्याची नोकरीही गेली. पण कितीही संकट आली तरी तो आपल्या ध्येयापासून दूर गेला नाही. अचूक लक्ष्य साधत त्याने आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. आता या पदकानंतर त्याला अपेक्षा आहे ती आपल्याला पुन्हा नोकरी मिळेल याची... ही गोष्ट आहे. नेमबाज संजीव राजपूतची.
संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताला रौप्यपदक जिंकून दिले. अखेरच्या प्रयत्नांत त्याला सातत्य राखण्यात अपयश आले, परंतु त्याने भारतासाठी पदक निश्चित केले. त्याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. राजपूतने 452.7 गुणांची कमाई केली.
रौप्यपदक पटकावल्यावर संजीव म्हणाला की, " स्पर्धा चांगलीच चुरशीची होती. कारण काही वेळा जोरात वारा सुटला होता. त्यामुळे लक्ष्यभेद करणे सोपे नव्हते. माझे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. देशाला मी रौप्यपदक जिंकवून देऊ शकलो, याचा अभिमान आहे. आता या कामगिरीनंतर तरी मला पुन्हा नोकरी मिळेल, अशी आशा आहे. "