Asian Games 2023 India vs Bangladesh Semifinal: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये यंदाच्या वर्षीचे आणखी एक पदक पक्के केले. भारतानेबांगलादेशच्या संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव केला. बांगलादेशने पहिले फलंदाजी करताना २० षटकांत ९६ धावा केल्या होत्या. भारताने ९७ धावांचे आव्हान ९ गडी राखून ९.२ षटकांमध्ये पूर्ण केले आणि स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीत धडक मारली.
आशियाई क्रीडा स्पर्धेत बांगलादेशने उपांत्य फेरीत भारताविरूद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांना तो निर्णय फारसा फळला नाही. बांगलादेशच्या संघाकडून परवेझ एमॉनने ३२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. तर जाकर अलीने २९ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने कशीबशी २० षटकांत ९ बाद ९६ धावांची खेळी केली. भारताकडून आर साई किशोरने १२ धावांत ३ बळी घेतले तर वॉशिंग्टन सुंदर १५ धावांत २ बळी टिपले.
९७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला खातेही उघडला आले नाही. चार चेंडूत शून्य धावा करत तो माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्माने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या साथीने नाबाद विजयी भागीदारी केली. तिलक वर्माने २६ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. ऋतुराजनेही नाबाद ४० धावा केल्या. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.