Join us  

स्मृतीचा जबरा फॅन! मानधनाला म्हणाला 'देवी', एक झलक पाहण्यासाठी केला १२०० किमीचा प्रवास

भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधनाचे जगभर चाहते आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 3:48 PM

Open in App

asian games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधनाचे जगभर चाहते आहेत. नॅशनल क्रश म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या स्मृतीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. याचाच प्रत्यय सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आला. महिलांच्या क्रिकेट विभागात भारताच्या रणरागिणींनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. श्रीलंकेला चीतपट करून हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने ही किमया साधली. आशियाई स्पर्धेत स्मृतीच्या एका चाहत्याने 'मानधना द गॉडेस' अशा आशयाचा पोस्टर झळकावला. खरं तर स्मृतीचा हा जबरा फॅन आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी बीजिंगहून हांगझोऊला पोहचला होता. 

जपानमधून आलेल्या या चाहत्याने भारतीय शिलेदाराचे तोंडभरून कौतुक केले. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटशी नातं जोडलं. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि स्मृती मानधना या खेळाडूंचा चाहता असल्याचे तो सांगतो. जुन्यु वेई नावाचा हा चिनी नागरिक जपानमध्ये शिकतो. त्याने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले, "मी जसप्रीत बुमराहला २०१९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करताना पाहिले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्माला फॉलो करतो, हे दोघेही आताच्या घडीला सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यात सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहने २०१९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती." 

क्रिकेटबद्दल कशी माहिती मिळाली, असे विचारले असताना त्याने सांगितले की, मी शिकत असलेल्या बीजिंगमधील विद्यापीठात क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणून मला याबद्दल थोडीफार माहिती आहे. चीनमध्ये क्रिकेट फारसे खेळले जात नाही, इथे क्वचितच क्रिकेटचे सामने होतात. खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. केवळ ग्वांगझू या शहरात २०१० आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान क्रिकेट खेळले गेले होते, तिथेच फक्त क्रिकेट स्टेडियम आहे. 

भारतीय महिलांची 'सोनेरी' कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. या विजयात स्मृती मानधनाने मोलाची भूमिका बजावली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. भारताने सुवर्ण पदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेशला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताने ११६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत केवळ ९७ धावा करता आल्या.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघ