नेपाळवर २३ धावांनी मात करत भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यशस्वी जयस्वालचं शतक आणि अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल मारत भारताने नेपाळसमोर २०३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने चिवट प्रतिकार केला. तसेच २० षटकांमध्ये ९ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची भारताची संधी हुकली.
भारताने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळने सावध सुरुवात केली होती. मात्र अफिफ शेख (१०), कुशल भुर्टेल (२८) , कुशल मल्ला (२९) आणि रोहित पु़डेल हे ठऱाविक अंतराने बाद झाल्याने ११ व्या षटकात नेपाळची अवस्था ४ बाद ७७ अशी झाली होती. मात्र दीपेंद्र सिंह (३२) आणि संदीप जोरा (२९) यांनी पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची आक्रमक खेळी करत सामन्यात रंगत आणली.
मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर नेपाळडा डाव गडगडला. तरीही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर उभे राहत नेपाळच्या फलंदाजांनी संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद १७९ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताकडून अवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. तर अर्शदीप सिंहने २ आणि साई किशोरने एक बळी टिपला.
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये २०२ धावा फटकावत नेपाळसमोर २०३ धावांचे आव्हान उभे केले होते. भारताकडून यशस्वी जयस्वालने ४९ चेंडूत १०० धावांची शतकी खेळी केली होती. तर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंह याने १५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली होती. एकीकडून एकेक सहकारी बाद होत असताना यशस्वी जयस्वालने एक बाजू लावून धरली होती. त्याने चौकार, षटकारांची बरसात करत अवघ्या ४८ चेंडूतच आपलं शतक पूर्ण केलं. यशस्वीचं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलंच शतक ठरलं.