युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेपाळची धुलाई केली. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर भारताने नेपाळसमोर मोठं आव्हान ठेवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे.
आज भारत आणि नेपाळ यांच्यात रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. ऋतुराजच्या तुलनेत यशस्वी अधिक आक्रमकपणे फटकेबाजी करत होता.त्याने अवघ्या २२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही यशस्वीने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. मात्र दुसरीकडून नेपाळी गोलंदाजांनी भारताला एकामागोमाग एक धक्के दिले. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी सलामी दिल्यानंतर नेपाळच्या दीपेंद्र सिंहने ऋतुराजला माघारी धाडले. त्याने २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सोमपाल कामीने तिलक वर्माचा (२ धावा) त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. तर संदीप लामिचाने याने जितेश शर्माला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करत भारताला अडचणीत आणले.
एकीकडून एकेक सहकारी बाद होत असताना यशस्वी जयस्वालने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने चौकार, षटकारांची बरसात करत अवघ्या ४८ चेंडूतच आपलं शतक पूर्ण केलं. यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारंचा समावेश होता. यशस्वीचं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलंच शतक आहे.