नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सुपर-4 मध्ये पराभूत झालेल्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा आसिफ अली बाद होताच सामन्याला गालबोट लागले. कारण फरीद अहमदने आसिफ अलीचा बळी घेतल्यावर पाकिस्तानी खेळाडूचा ताबा सुटला आणि त्याने मारण्यासाठी बॅट उचलली. बाद झाल्यानंतर आसिफ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र पंच आणि खेळाडूंनी केलेल्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आसिफ अलीचा रूद्रावतार पाहून सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका होत असताना आता अफगाणिस्तानच्या माजी खेळाडूने त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
गुलबदिन नायबने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "हा आसिफ अलीचा अत्यंत मूर्खपणा आहे. त्यामुळे त्याच्यावर बाकीच्या टूर्नामेंटमधून बंदी घातली पाहिजे, कोणत्याही गोलंदाजाला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे पण शारीरिक असणे अजिबात मान्य नाही." अफगाणिस्तानच्या खेळाडूच्या म्हणण्यानुसार आसिफ अलीला इतर स्पर्धेतून बॅन करायला हवे, अशी मागणी त्याने आयसीसीकडे केली आहे.