गुवाहाटी : आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात आतापर्यंत 23 प्राणी मरण पावले आहेत. आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 55 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीवर भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मान नागरिकांना आवाहन केले आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी रोहितनं ही स्पर्धा गाजवली. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधित धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितनं अव्वल स्थान पटकावले. त्यानं 9 सामन्यांत 648 धावा चोपल्या. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. एका वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतक करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. उपांत्य फेरीतील पराभवानं रोहित प्रचंड निराश आहे. त्यामुळे त्यानं चार दिवसानंतर आज सोशल मीडियावर ट्विट केले.
त्यानं आसाममध्ये आलेल्या पूरग्रस्त परस्थितीवर चिंता व्यक्त केली. या पुरामुळे तेथील वन्यजीवांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांनी हक्काचे घर गमावले आहे. त्यामुळे नव्या निवाऱ्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे अनेक प्राणी रस्त्यावर आलेले दिसत आहेत. त्यामुळे रोहितनं तेथील लोकांना वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे.