ढाका - एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा पाकिस्तानी गोलंदाज हसन अली याला सामना सुरु असताना मैदानातच अस्थमाचा अटॅक आला. यानंतर तात्काळ त्याने मैदान सोडलं. उपचार झाल्यानंतर हसन अली मास्क घालून पुन्हा एकदा मैदानात उतरला. हसन अली बांगलादेश प्रीमिअर लिगमधील सामन्यात खेळत होता. विक्टोरियन्स आणि सिल्हेट सिक्सर्स यांच्यात हा सामना सुरु होता. हसन अली विक्टोरियन्स संघाकडून खेळत होता. मीरपूरमधील शेरे बांगलादेश स्टेडिअमवर हा सामना पार पडला.
या सामन्यात विक्टोरियन्सने प्रथम फलंदाजी करत 171 धावांचं आव्हान दिलं होतं. हसन अलीने 35 धावा केल्या होत्या. पण क्षेत्रणरक्षणासाठी मैदानात उतरल्यानंतर काही वेळाने हसन अलीला अस्थमा अटॅक आला. उपचारासाठी त्याने मैदान सोडलं. काही वेळाने पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. अखेर विक्टोरियन्सने 25 धावांनी हा सामना जिंकला. सिल्हेट सिक्सर्स 20 ओव्हर्समध्ये फक्त 145 धावा करु शकले. त्यांनी एकूण सात विकेट गमावले. हसन अलीने दोन विकेट घेतल्या. या विजयासोबतच विक्टोरियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपवर पोहोचला आहे.
हसन अली मैदानावर मास्क घालून उतरल्याने श्रीलंका संघ भारताविरोधात मास्क घालून उतरलेल्या सामन्याची चर्चा सुरु झाली होती. दिल्लीमधील कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंका संघ मास्क घालून मैदानात उतरला होता. त्यांनी प्रदूषणाची तक्रार केली होती. मास्क घालून खेळाडू खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. हसन अलीने मास्क घालून क्षेत्ररक्षण केल्याने बांगलादेश प्रीमिअर लीगही चर्चेत आलं. पण हसन अलीने मास्क घालण्यामागचं कारण प्रदूषण नसून अस्थमा अटॅक होतं.
दिल्ली कसोटी सामन्यात श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल आणि भारतीय गोलंदाज मोहम्मद शम्मी यांना प्रदूषणाचा त्रास झाल्याचं दिसलं. दोन्ही खेळाडूंनी मैदानातच उलटी केली. होती दरम्यान श्रीलंका संघाचे मॅनेजर असांका गुरुसिन्हा यांनी 'दोन्ही संघांनी आपापल्या ड्रेसिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडर लावले आहेत. आपण एखाद्या ड्रेसिंग रुम नाही तर हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये असल्यासारखं वाटू लागलं आहे' अशी प्रतिक्रिया दिली होती.