Cricket For A Cause : नामांकित क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तू उद्या शुक्रवारी लिलावात असणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून अनाथ मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंच्या 'आठवणी' २३ ऑगस्ट रोजी लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येतील. विप्ला फाऊंडेशनने अनाथ मुलांसाठी हे पाऊल टाकले. मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथे लिलाव प्रक्रिया पार पडेल. लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी अनाथ मुलांसाठी पुढाकार घेत एका फाउंडेशनच्या मदतीने त्यांना मदतीचा हात म्हणून कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या जोडप्याने विपला फाउंडेशनच्या माध्यमातून रक्कम गोळा करण्यासाठी बड्या क्रिकेटपटूंची मदत घेतली. या उपक्रमाचे नाव 'क्रिकेट फॉर ए कॉज' असे ठेवण्यात आले आहे.
अथिया आणि राहुलने या उपक्रमासाठी राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, आणि लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू जोस बटलर, क्विंटन डीकॉक, मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन या नावांची माहिती दिली आहे. २३ ऑगस्ट रोजी लिलाव प्रक्रिया पार पडेल.
विराट कोहलीची जर्सी आणि ग्लोव्ह्ज लिलावात असणार आहे. यामाध्यमातून अथिया शेट्टी आणि लोकेश राहुल अनाथ मुलांची मदत करू इच्छित आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा यांचीही बॅट आणि ग्लोव्ह्ज लिलावात असेल. गरिबांसाठी पुढाकार घेत असलेला राहुल त्याची बॅट, हेल्मेट आणि जर्सी लिलावात घेऊन येईल.