गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने बाजी मारताना राजस्थान रॉयल्सला १० धावांनी नमवले. यासह लखनऊ गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले. राजस्थान अव्वल स्थानी कायम असून दोन्ही संघांचे ८ गुण आहेत. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर लखनऊ २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या. यानंतर लखनऊ राजस्थानला २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर रोखले. आवेश खान आणि मार्कस स्टोइनिस यांनी मोक्याच्यावेळी बळी घेत लखनऊला विजयी केले.
धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी ६९ चेंडूंत ८७ धावांची सलामी देत राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, स्टोइनिसने १२ व्या षटकात जैस्वालला बाद केले आणि राजस्थानच्या फलंदाजीला गळती लागली. राजस्थानच्या फलंदाजांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. आवेशने ३ तर स्टोइनिसने २ बळी घेत राजस्थानला बॅकफूटवर नेले.
राजस्थानविरुद्ध केएल राहुलने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२१.८८ होता. यावेळी राहुलने ४ चौकार आणि १ षटकार मारला. लखनौच्या डावातील ९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर, जो युझवेंद्र चहलने टाकला होता, राहुलने स्लॉग स्वीपसह षटकार मारला, जो प्रेक्षक गॅलरीत १०३ मीटर अंतरावर पडला, तर त्याची पत्नी अथिया शेट्टी देखील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होती. राहुलने हा लांबलचक षटकार मारताच अथियाचा आनंद पाहण्यासारखा होता. आथियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुणतालिकेत मोठे बदल; राजस्थान रॉयल्स अजूनही अव्वल स्थानी
राजस्थान विरुद्ध लखनऊच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहे. राजस्थान रॉयल्स ६ सामन्यात ४ विजय मिळवत ८ गुणांसह गुणतालिकेत अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. तर लखनऊ सुपर जायट्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊनेही ६ सामन्यात ४ विजय मिळवले आहेत. चेन्नई सुपरकिंग्स तिसऱ्या क्रमांकावर असून गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्स पाचव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स सातव्या स्थानी असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आठव्या क्रमांकावर आहे. सनराजर्स हैदराबाद नवव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने ५ पैकी एकही सामना जिंकलेला नाही, त्यामुळे गुणतालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.
Web Title: Athiya Shetty's ecstatic reaction after KL Rahul hits Chahal for 103m six during LSG vs RR IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.