Join us

मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरचे झोकात पदार्पण, Video

Mumbai T-20 league : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये मंगळवारी पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:29 IST

Open in App

मुंबई : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये मंगळवारी पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात महत्त्वाची विकेट घेतली. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुनने ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट संघाला मोठा धक्का दिला. अर्जुनने सामन्याच्या चौथ्याच षटकात नाईटचा सलामीवीर करण शाहला बाद केले. अर्जुनच्या गोलंदाजीवर करणने टोलावलेला चेंडू आकर्षित गोमेलने टिपला. मागील अनेक वर्ष कामगिरीत सुधारणा होण्यासाठी अर्जुन झटत होता. त्याच्या या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि मुंबई ट्वेंटी-20 लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावात त्यानं वरिष्ठ गटात प्रवेश केला आहे. मुंबई ट्वेंटी-20 लीगच्या लिलावात अर्जुनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस रंगली, परंतु त्याला आकाश टायगर्स MWS संघाने चमूत घेतले. अर्जुनसाठी आकाश टायगर्स संघाने 5 लाख रुपये मोजले.

अर्जुनकडे मुंबई 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गतवर्षी त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि दोन डावांत त्याला केवळ 14 धावा करता आल्या होत्या. मात्र, डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 चषक स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळाले. गत महिन्यात त्यानं एका स्थानिक वन डे सामन्यात 23 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरसचिन तेंडुलकर