- अयाझ मेमन/> विश्वचषकासाठी १६ सामने उरले असून आता विश्वचषकासाठी भारतीय संघांची निवडप्रक्रिया सुरू होईल. कोणते खेळाडू संघात तर कोणते बाहेर असतील, हे हळूहळू स्पष्ट होईल. त्यामुळे वेस्ट इंडिज आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. ज्या पद्धतीने पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. त्यावरून त्याने विश्वचषकासाठी आपल्या स्थानाची दावेदारी मजबूत केली आहे. पृथ्वीच्या ‘शो’नंतर सलामी जोडी कोण असणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे; कारण नियमित सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल. राहुल यापैकी एकाला झटका बसेल. रोहितने गेल्या सामन्यात जबरदस्त शतकीय खेळी केली. आता तो दबावातून पुढे गेला आहे. कसोटीतून बाहेर पडलेल्या या फलंदाजाला पुन्हा संघात घ्यावे, असे सौरवने नुकतेच म्हटले आहे. तीन-चार आठवड्यांत आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडला जाईल. त्याला संघात घ्यायचे की नाही याबाबत निवडकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे.ज्या पद्धतीने रोहित धावा करतो त्यावरून तो एकदिवसीय क्रिकेटमधील विराटनंतरचा सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. त्यामुळे त्याला धोका नाही. इतरांना मात्र धोका आहे. शिखर धवन आशिया चषकात चांगल्या फॉर्ममध्ये होता. निवडकर्ते आणि टीम व्यवस्थापनाची तो संघात राहावा, अशी इच्छा आहे; कारण लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन चांगले राहील; परंतु ताळमेळ तेव्हाच उपयोगी पडतो जेव्हा तुमचे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असतात. शिखर धावा करीत नसेल तर त्याच्यावर दबाव वाढेल.विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून तो ज्या पद्धतीने धावा करीत आहे., त्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच होईल. तिन्ही क्रिकेटमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे यात शंका नाही. क्रिकेटचाहत्यांनाही त्याच्या विक्रमाची उत्सुकता असते. मला वाटते, जेव्हा विराट कोहली निवृत्ती स्वीकारेल तोपर्यंत सर्व विक्रम त्याच्या हाती आलेले असतील. भारताकडे गोलंदाजीतही आता बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. वेगवान गोलंदाज उमेश यादवही आपली जागा पक्की ठेवू शकत नाही. मोहम्मद शमीनेही पुनरागमन केले असून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांचेही योगदान चांगले आहे.>‘महेंद्रसिंग धोनीने दुसरा गिअर टाकावा’गेल्या एक-दोन वर्षांपासून धोनीचा धावा करण्याचा वेग पाहता त्याने आपला दुसरा गिअर टाकावा, असे वाटते. विश्वचषकात धोनी हाच यष्टिरक्षक असेल, असे विराट आणि रवी शास्त्री यांनी म्हटले आहे; परंतु विश्वचषकाला अजून सात-आठ महिने बाकी आहेत. फॉर्म योग्य राहिला नाही तर या कालावधीत काहीही होऊ शकते. तो मजबूत झाला तर संघही मजबूत होतो. त्यामुळे धोनीसाठी आणि त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल की त्याने संघासाठी फलंदाजीत योगदान वाढवावे. ८०-९० नव्हे तर किमान ३०-४० धावा कराव्यात. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि त्याचे चाहतेही खुश होतील.( संपादकीय सल्लागार)