Join us  

पुन्हा लक्ष ‘विराट’ खेळीकडे! भारत - श्रीलंका दुसरी लढत आजपासून

गेल्या अडीच  वर्षांपासून कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक झळकावता आलेले नाही. पहिल्या सामन्यात शानदार सुरुवातीनंतरही त्याला फायदा घेता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:23 AM

Open in App

बंगळुरु : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत केवळ तीन दिवसांमध्ये जिंकून १-० अशी आघाडी घेतलेला भारतीय संघ शनिवारपासून दुसऱ्या लढतीत पाहुण्या श्रीलंकेला नमविण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळविण्यात येईल. सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेतील स्थान उंचावण्याचाही भारताचा निर्धार असेल. भारताला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी या सामन्यात सर्वांना प्रतीक्षा असेल ती विराट कोहलीच्या शतकी खेळीची.

गेल्या अडीच  वर्षांपासून कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक झळकावता आलेले नाही. पहिल्या सामन्यात शानदार सुरुवातीनंतरही त्याला फायदा घेता आला नाही. विशेष म्हणजे कोहलीने अखेरचे शतकही दिवस-रात्र कसोटी सामन्यातच झळकावले होते. नोव्हेंबर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळताना कोहलीने १३६ धावांची दमदार खेळी केली होती. त्यानंतर मात्र कोहलीला २८ कसोटी डावांमध्ये एकदाही शतक ठोकता आलेले नाही. कोहलीची यादरम्यान सर्वोच्च खेळी ७९ धावांची राहिली असून, त्याने सहा अर्धशतके झळकावली.

लंकेविरुद्धचा दुसरा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार असून, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरकडून (आरसीबी) खेळणाऱ्या कोहलीसाठी हे एकप्रकारे घरचे मैदान आहे. त्यामुळे येथील खेळपट्टीची पूर्ण माहिती असलेल्या कोहलीला या सामन्यात मोठा फायदा होईल.गुलाबी चेंडूने खेळविण्यात येणाऱ्या या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा दुखापतीतून सावरलेल्या अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला जयंत यादवच्या स्थानी संधी मिळू शकते. मोहाली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात जयंतला फारशी छाप पाडता आली नव्हती. श्रीलंकेची फलंदाजी फारशी मजबूत नसतानाही त्याला दोन्ही डावात एकही बळी मिळवता आला  नव्हता. दुसरीकडे अक्षरने याआधीच्या गुलाबी चेंडूच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे ११ बळी घेतले होते.

आधीच पिछाडी, त्यात दुखापतीश्रीलंकेचा संघ मालिकेत ०-१ असा पिछाडीवर पडलेला असताना त्यांना मोठ्या दुखापतींनाही सामोरे जावे लागले आहे. वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा मांसपेशी ताणल्या गेल्याने सामन्यात खेळू शकणार नाही. दुष्मंता चमीराने टाचेच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी चमिका करुणारत्नेला संधी मिळेल. शिवाय पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेला पाथुम निसांकालाही दुखापत झाल्याने त्याच्या जागी अनुभवी दिनेश चंदीमलला संधी मिळेल. अशा परिस्थितीत कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्त्वाची ‘कसोटी’ लागेल. त्याचप्रमाणे, अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज याच्याकडूनही लंकेला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत, उमेश यादव, सौरभ कुमार आणि प्रियांक पांचाल.श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, दुष्मंता चमीरा, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, लसिथ एम्बुलडेनिया, विश्व फर्नांडो, सुरंगा लकमल, लाहिरू थिरिमाने, लाहिरु कुमारा, कुसाल मेंडिस, पाथुम निसांका, जेफ्री वंडारसे, प्रवीण जयविक्रमा आणि चमिका करुणारत्ने.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंका
Open in App