लीड्स : कर्णधार विराट कोहली हा दीर्घकाळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. आज बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीत मोठी खेळी करीत पाच सामन्यांच्या मालिकेत संघाला विजयी आघाडी मिळवून देण्याचा तो प्रयत्न करेल.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरतो. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी मात्र दोघांनी जवळपास ५० षटके फलंदाजी करीत फाॅर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांची फलंदाजी मात्र भारताची सकारात्मक बाजू आहे. दोघांनी आव्हानात्मक परिस्थितीत संयम आणि तंत्र यांची झलक सादर केली. राहुल हा प्रत्येक डावात अधिक आत्मविश्वासाने खेळला. रोहित देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र पूलचा फटका केव्हा मारायचा हे निश्चित करण्याची गरज आहे. दोनदा तो पूलच्या फटक्यावर बाद झाला.
ऋषभ पंत नैसर्गिक खेळी करीत असून, रवींद्र जडेजा सातव्या स्थानाला न्याय देत आहे. संघात त्याची भूमिका डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाच्या तुलनेत फलंदाज म्हणून मोठी वाटते. शार्दूल ठाकूर फिट असला तरी कोहली गोलंदाजी आक्रमणात कुठलाही बदल करेल, असे वाटत नाही. हेडिंग्लेतील स्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल वाटत असल्याने भारत चार वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. मोहम्मद सिराजमुळे वेगवान मारा आणखी भेदक बनला. सिराजने लॉर्ड्सवर पाचव्या दिवशी टिच्चून मारा करीत लक्ष वेधले होते.
दुसरीकडे डेव्हिड मलानच्या पुनरागमनामुळे फलंदाजी भक्कम होण्याची इंग्लंडला अपेक्षा आहे. मलानने अखेरची कसोटी तीन वर्षांआधी खेळली होती. तथापि, प्रथम श्रेणीचा त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. डावखुरा मलान तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येणार असल्यामुळे हसीद हमीद हा रोरी बर्न्ससोबत डावाला सुरुवात करेल.
५१ वर्षांपासून भारत हेडिंग्लेत अपराजित
भारतीय संघ येथे १९ वर्षांनतर कसोटी सामना खेळणार आहे. मागच्या वेळी २००२ ला साैरव गांगुलीच्या नेतृत्वात संघ येथे खेळला होता. भारतीय संघ येथे ५१ वर्षांपासून अपराजित आहे. त्याआधी १९६७ ला भारत येथे पराभूत झाला होता. इंग्लंड संघाची मात्र २०१९ च्या ॲशेस कसोटीत ६७ धावांवर घसरगुंडी झाली होती.
फलंदाजांसाठी खेळपट्टी आव्हानात्मक
मागच्या काही वर्षांपासून हेडिंग्लेची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक मानली जाते. यजमान संघ येथे दहापैकी पाच सामन्यात पराभूत झाला आहे. चार सामने त्यांनी जिंकले तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. इंग्लंडला येथे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि द.आफ्रिका संघांनी धूळ चारली. मागच्या दोन सामन्यात मात्र इंग्लंड या मैदानावर विजयी ठरला आहे.
विराट कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ ला साजरे केले होते. सध्याच्या मालिकेत तो दोनदा ४० धावांपर्यंत पोहोचला खरा, मात्र मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दोन्ही सामन्यात ऑफस्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट बाद झाला. अशावेळी हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर तंत्रशुद्ध फलंदाजीची त्याच्याकडून अपेक्षा असेल.
भारताने येथे २००२ ला अखेरचा कसोटी सामना खेळला. तो सामना एक डाव ४६ धावांनी जिंकलादेखील. सध्याच्या संघातील एकाही खेळाडूला या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही. अशावेळी भारतीय संघ किती लवकर परिस्थितीशी ताळमेळ साधतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स ॲन्डरसन, जोनाथन बेयरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेंस, साकिब महमूद, डाविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन
Web Title: Attention to Virat Kohli’s ‘giant’ play; The third Test from today against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.