नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक ही विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली. रवी शास्त्री प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने पायउतार झाले, तर दुसरीकडे विराट कोहलीने विश्वचषकानंतर आपण टी-२० संघाचं कर्णधारपद सोडले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी महेंद्रसिंग धोनीचा अनुभव भारतीय संघाला मदतशीर ठरेल असे सांगून त्याची विश्वचषक संघाच्या मेंटॉरपदी निवड केली होती.
भारतीय संघाचे माजी गोलंदाज अतुल वासन यांनी एक धक्कादायक दावा केला. विराट कोहली आणि रवी शास्त्री भारतीय संघाला नियंत्रित करीत असल्याने धोनीला मेंटॉर म्हणून आणण्यात आले असा दावा वासन यांनी केला. वासन यांच्या म्हणण्यानुसार कोहली आणि रवी शास्त्री यांच्या नेतृत्वातील संघ व्यवस्थापनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेत संतुलन यावे यासाठी धोनीला आणण्यात आले होते. ‘मी तुम्हाला सांगतो...धोनीला संतुलन ठेवण्यासाठी आणण्यात आले, कारण प्रत्येकाला रवी शास्त्री आणि विराट कोहली पूर्णपणे हाताळत असून, आपल्याला हवी तशी निवड आणि निर्णय घेत आहेत असे वाटत होते,’ असे अतुल वासन यांनी सांगितले.