बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या पर्वाचा लिलाव आज शनिवारपासून सुरू होत आहे. दोन दिवसांच्या या प्रक्रियेत रविचंद्रन अश्विन आणि बेन स्टोक्स यांच्यावर मोठ्या रकमेची बोली अपेक्षित आहे. यंदा ५७८ खेळाडू लिलावात सहभागी होत आहेत. त्यातील ३६१ भारतीय आहेत.
भारत आणि जगातील अव्वल १६ खेळाडूंंना एलिट दर्जा बहाल करण्यात आला असून, या खेळाडूंचे आधारमूल्य दोन कोटी इतके आहे. त्यात स्टोक्स, अश्विन, शिखर धवन, मिशेल स्टार्क, ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश होतो. मागच्या सत्रात १४ कोटी ५० लाख रुपये इतकी बोली लागलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला यंदा यापेक्षा मोठी रक्कम मिळेल, अशी चिन्हे आहेत. २००८ साली आयपीएलला सुरुवात झाल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतीयांवर बोली होण्याची यंदा पहिलीच वेळ असेल. टी-२० प्रकारात धवन आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा भाग नसले तरी या दोघांना लिलावात मोठी किंमत मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
फलंदाजी, आॅफस्पिन गोलंदाजी आणि आणि यष्टिरक्षण करण्याच्या क्षमतेपोटी केदार जाधव याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पुन्हा एकदा संधी देईल. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंना वाढती मागणी आहे. टी-२० प्रकारात यशस्वी खेळाडू लोकेश राहुल, मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंवर अनेक फ्रेन्चायसींचा डोळा असेल. संघात चांगला फिरकी गोलंदाज असावा, असे फ्रेन्चायसींना वाटत असल्याने अफगाणिस्तानचा राशीद खान यालादेखील मोठा भाव मिळू शकतो.
चेन्नई सुपरकिंग्स स्थानिक खेळाडू अश्विन याला पुन्हा एकदा संघात आणेल, असा विश्वास महेंद्रसिंग धोनी याने काही दिवसाआधी व्यक्त केला होता. त्याच्यावर सीएसके किती रक्कम लावेल, हे पाहणे उत्कंठापूर्ण ठरेल. सीएसके संघ आॅस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करेल. धोनीने याआधी डग बोलिंगर आणि आशिष नेहरा याला संघात स्थान दिले होते. आरसीबीने स्टार्कसाठी ‘राईट टू मॅच कार्ड’ वापरल्यास सीएसके जयदेव उनाडकटला प्राधान्य देऊ शकते. मागच्या सत्रात तो प्रभावी ठरला होता. दुसरीकडे ड्वेन ब्राव्हो हा धोनीचा भरवशाचा खेळाडू असल्याने सीएसके त्याच्यावर राईट टू मॅच कार्डचा वापर करेल.
दिल्ली डेअरडेव्हिल्स गंभीर आणि अश्विन यांना स्वत:कडे खेचण्यास उत्सुक आहे. गंभीरला खरेदी केल्यास त्याला कर्णधार नेमले जाईल. केकेआरकडेही गंभीरला रिटेन करण्याचा पर्याय आहे. याच संघात ख्रिस लीन हा प्रभावी खेळाडू असल्याने त्याच्यासाठी राईट टू मॅच कार्डचा वापर होऊ शकतो. राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथला रिटेन केले असून, त्यांच्याकडे लिलावात सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. भारताविरुद्ध दोन टी-२० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणा-या एविन लुईसकडेही या संघाचे लक्ष आहे. अलीकडे ४०० टी-२० सामने खेळणारा कीरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडे कायम राहण्याची शक्यता आहे. किंग्स पंजाब संघ हरभजनकडे नेतृत्व सोपविण्याच्या विचारात आहे.
प्रत्येक फ्रेन्चायसीला १८ सदस्यांच्या संघात किमान १० भारतीय खेळाडूंची गरज आहे. अशावेळी कुणाल पांड्या, बासिल थम्पी, आवेश खान, दीपक हुड्डा यांना चांगली रक्कम मिळू शकते. १४० किमी प्रतिताशी वेगाने मारा करणारा अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज नागरकोटी याच्याकडे लक्ष आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला विंडीजमध्ये जन्मलेला जोफ्रा आर्चर याच्याकडेही लक्ष असेल. त्याने बिग बॅशमध्ये शानदार कामगिरी केली आहे.