मुंबई : पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार आहे. या दोन संघांच्या निवडीसाठी १७ ऑक्टोबरला लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. या लिलावात संघाना विकत घेण्यासाठीची बोली ५ ऑक्टोबरपर्यंत जमा करावी लागेल. लिलावासंदर्भात चौकशीसाठी २१ सप्टेंबर हा शेवटचा दिवस ठरविण्यात आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
आयपीएलच्या गव्हर्निंग काैन्सिलने ३१ ऑगस्टला दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात केली होती. या प्रक्रियेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी दोन नवीन संघांचा समाविष्ट करण्याचे ठरविण्यात आले. दोन संघांच्या समावेशाने पुढील आयपीएलमध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरणार आहे.
आयपीएलचा कालावधी वाढणार
दोन संघांच्या समावेशाने आयपीएलच्या पुढील हंगाम ७४ सामन्यांचा असेल. त्यामुळे प्रत्येक संघाला १४ ते १८ साखळी सामने खेळावे लागू शकतात. आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला घरच्या मैदानावर ७ आणि दुसऱ्या संघांच्या मैदानावर ७ असे एकूण १४ सामने खेळावे लागतात. पुढील वर्षी संघांच्या संख्येत वाढ होणार असल्याने प्रत्येक संघाला १८ सामने खेळायला लागू शकतात. त्यामुळे एकूण स्पर्धेची वेळ वाढणार आहे. अशा वेळी संघांना दोन गटांमध्ये विभागले जाऊ शकते.