AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates : पॅट कमिन्सची हॅटट्रिक आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सांघिक कामगिरी... याशिवाय बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने दिलेली कडवी झुंज... यामुळे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना प्रेक्षणीय ठरला. बांगलादेशने दिलेल्या १४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे दोनवेळा सामना थांबवावा लागला. ६.२ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला. तेव्हा ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता ६४ धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार यावेळी बरोबरीचा स्कोअर ३५/० होता. यात ऑस्ट्रेलियन संघ बराच पुढे होता. पाऊस कायम राहिला असता तर ऑस्ट्रेलियाच्या विजयावर तेव्हाच शिक्कामोर्तब झाला असता.
पण, पावसानंतर पुन्हा सामना सुरू होताच ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. रिशाद हुसेनने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. २१ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने ३१ धावा केल्या. सात षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद ६५ धावा अशी होती. कांगारूंना नवव्या षटकात कर्णधार मिचेल मार्शच्या रूपात दुसरा झटका बसला. ११.२ षटकापर्यंत खेळ पोहोचला असता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद १०० होती त्यामुळे कांगारूंचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी पुढे होता. पाऊस कायम राहिल्याने अखेर डकवर्थ लुईस या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक (५३ नाबाद) खेळी केली.
तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, कर्णधार नजमुल हुसैन शांतोने कडवी झुंज देताना सर्वाधिक (४१) धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने १८ व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर महमुदुल्लाह आणि महेदी हसन यांना बाद केले. त्यानंतर विसावे षटक घेऊन आलेल्या कमिन्सने पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदयोयला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आपली हॅटट्रिक पूर्ण केली. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाला सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी १४१ धावांचे लक्ष्य दिले. मागच्या सामन्यात बाकावर बसलेला पॅट कमिन्स आज संघाचा भाग आहे. त्याने या सामन्याच्या अखेरच्या षटकांत अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ॲडम झाम्पा (२), मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
बांगलादेशचा संघ -
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), अंजिद हसन, लिटन दास, शाकिब अल हसन, तौहीद हृदयोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, रिशन हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन साकिब, मुस्ताफिजुर रहमान.
Web Title: AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Australia beat Bangladesh BY 28 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.