ICC ODI World Cup AUS vs ENG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून जवळपास बाहेर झालेल्या इंग्लंडने आज ऑस्ट्रेलियाचे धाबे दणाणून सोडले. उपांत्य फेरीसाठी अखेरचे प्रयत्न करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या गतविजेत्या इंग्लंडसमोर २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीची पात्रता, हेही लक्ष्य होते. त्यामुळे त्यांनी आज दमदार खेळ केला. ख्रिस वोक्सने ४ विकेट्स घेतल्या, तर मार्क वूड व आदील राशीद यांनी प्रत्येकी २ बळी टीपले.
इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला बोलावले अन् ख्रिस वोक्सने कागारूंच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ट्रॅव्हीस हेड ( ११) व डेव्हिड वॉर्नर ( १५) यांच्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाचा संघ आता पुनरागमन करेल असे वाटत असताना आदील राशीदने फिरकीने कमाल केली. स्मिथ ४४ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ राशीदने जॉश इंग्लिसला ( ३) बाद केले. लाबुशेनची ७१ धावांची खेळी मार्क वूडने संपुष्टात आणली.
कॅमेरून ग्रीन व मार्कस स्टॉयनिस यांनी सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. डेव्हिड विलिच्या चेंडूला स्क्वेअर लेगला पोहोचवण्याच्या प्रयत्नात ग्रीनचा ( ४७) त्रिफळा उडाला. लिएम लिव्हिंगस्टोनने ऑसींना मोठा धक्का देताना स्टॉयनिसला ( ३५) बाद केले. कर्णधार पॅट कमिन्सही ( १०) लगेच बाद झाला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय पुनरागमन केले. अॅडम झम्पाच्या उपयुक्त २९ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २८६ धावांपर्यंत मजल मारली.