मेलबर्न - तिसऱ्या कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि १४ धावांनी मात करत ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक अॅशेस मालिकेवर कब्जा केला आहे. नवोदित गोलंदाज स्कॉट बोलँड याने केलेल्या भेदक माऱ्यासमोर तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ६८ धावांत गारद झाला. त्याबरोबरच सलग तीन सामने गमावल्याने इंग्लंडला अॅशेस गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हीरो ठरेल्या बोलँड याने अवघ्या ७ धावा देत सहा बळी टिपले. तर मिचेस स्टार्कने ३ आमि कॅमरून ग्रीनने एक बळी टिपला.
दुसऱ्या दिवसअखेरच्या ४ बाद ३१ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडला पराभवापासून वाचवण्याचे आव्हान कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स यांच्यासमोर होते. मात्र ११ धावांवर स्टोक्स स्टार्कची शिकार झाला. त्यानंतर बोलँडने ११ चेंडूत जॉनी बेअस्टो, जो रूट, मार्क वूड आणि ऑली रॉबिन्सन यांना बाद केले. तर जेस्म अँडरसनचा त्रिफळा उडवत कॅमरून ग्रीनने इंग्लंडचा डाव ६८ धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात चार विकेट्स अवघ्या ३१ धावांत गमावल्या होत्या. मिचेल स्टार्कने दोन तर पहिलाच सामना खेळत असलेल्या स्कॉट बोलँडने एक धाव देऊन दोन विकेट्स टिपल्या होत्या. त्याआधी पहिल्या दिवसाच्या ४ बाद ६१ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने मार्कस हॅरिसच्या अर्धशतकाच्या जोरावर २६७ धावांपर्यंत मजल मारत ८२ धावांची आघाडी घेतली होती.