Five Wicket Haul By Jasprit Bumrah Gabba Brisbane Test : ब्रिस्बेनच्या मैदानात ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ जोडीनं टीम इंडियाच्या गोलंदाजाचे खांदे पाडले. दोघांनी शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेऊन पोहचले. ही जोडी फोडणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असताना पुन्हा जसप्रीत बुमराहच टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. पहिल्या दोन विकेट्स मिळवून देणाऱ्या बुमराहनं शतकी खेळी करणाऱ्या स्मिथला रोहित करवी झेल बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेला मिचेल मार्शलाही बुमराहने सेट होण्याची संधी दिली नाही. त्यानंतर ट्रॅविस हेडच्या रुपात ऑस्ट्रेलियाला त्याने आणखी एक धक्का दिला. हा मोठा मासा गळाला लागताच जसप्रीत बुमराहनं ब्रिस्बेन कसोटीत ५ विकेट्सही आपल्या खात्यात जमा केल्या. पर्थ कसोटीनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत दुसऱ्यांदा त्यांनी फाइव्ह विकेट्स हॉलचा पराक्रम करून दाखवला आहे. कसोटी क्रिकेटमधील १२ वेळी त्याने ही कामगिरी नोंदवली आहे.
पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहनं दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. नितीश कुमार रेड्डीनं लाबुशेनच्या रुपात ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. ३ बाद ७५ या धावसंख्येवरून ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संघाचा डाव सावरला दोघांनीही शतके झळकावत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी २४१ धावांची भागीदारी रचली. जसप्रीत बुमराहनं स्टीव्ह स्मिथला कॅप्टन रोहित शर्मा करवी झेलबाद केले. तो १९० चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने १०१ धावा करून तंबूत परतला. ३१६ धावांवर बुमराहनं ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला मिचेल मार्शला बुमराहनं कोहलीकरवी झेलबाद केले. त्याने संघाच्या धावसंख्येत फक्त ५ धावांची भर घातली. टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या ट्रॅविस हेडच्या रुपात बुमराहनं संघाला सहावे यश मिळवून दिले. हेडनं १६० चेंडूत १८ चौकाराच्या मदतीने १५२ धावांची खेळी केली.