Massive Mix Up Between Virat Kohli And Yashasvi Jaiswal Run Out : मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या ४७४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची पहिल्या डावाची सुरुवात एकदम खराब झाली. ५१ धावांत टीम इंडियाने पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल अन् विराट कोहली जोडी जमली होती. दोघांच्या खेळीनं टीम इंडिया कमबॅक करतीये असं वाटत होते. पण गडबड घोटाळा झाला अन् ही जोडी फुटली.
यशस्वी-विराट यांच्यात गडबड घोटाळा; ऑस्ट्रेलियानं साधला डाव
विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत धावफलकावर १५३ धावा लावल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत ही जोडी मैदानात थांबून किमान तिसरे सत्र तरी भारतीय संघाच्या नावे होईल, असे वाटत होते. पण भारताच्या पहिल्या डावातील ४१ व्या षटकात बोलँडच्या अखेरच्या चेंडूवर यशस्वी आणि विराट यांच्यातील ताळमेळ ढासळला. अन् या संधीचा फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं जैस्वालला रन आउट करत ही जोडी फोडण्यात यश मिळवलं. चेंडू खेळल्यावर चोरटी धाव घेण्यासाठी यशस्वी जैस्वाल धावला. अन् तो फसला. भारतीय संघाने १५३ यशस्वीच्या रुपात तिसरी आणि महत्त्वाची विकेट गमावली. तो ११८ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८२ धावा करून तंबूत परतला.
विराटसह टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत
यशस्वी जैस्वालची विकेट मिळाल्यावर ऑस्ट्रेलियानं विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवले. कोहली ८६ चेंडूत ३६ धावा करून बोलँडच्या गोलंजाजीवर बाद झाला. नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपला बोलँडनं खातेही उघडू दिले नाही. परिणामी सेट झालेली जोडी फुटल्यामुळे दिवसाअखेर भारतीय संघानं १६४ धावांत ५ विकेट्स गमावल्या.