Travis Head is cleaned up by Jasprit Bumrah for DUCK : बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅविस हेडला चौथ्या सामन्यात खातेही उघडता आले नाही. तो मैदानात आल्यावर रोहित शर्मानं लगेच जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी बोलावलं अन् बुमराहनं त्याला आल्या पावली माघारी धाडले. ऑस्ट्रेलिया संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना दमदार सुरुवात केली. यजमान संघ मजबूत स्थितीत असताना जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी संघाला बॅक टू बॅक यश मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले.
शॉर्ट लेंथ चेंडू सोडून फसला ट्रॅविस हेड
ऑस्ट्रेलियाच्या डावातील ६७ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं शॉर्ट लेंथ चेंडू टाकला. हा चेंडू स्टंपच्या वरुन जाईल, असा अंदाज बांधून ट्रॅविस हेडनं तो सोडला. पण हा चेंडू अगदी स्टंपच्या लेवलनं होता. त्यामुळे टॅविस हेड क्लीन बोल्ड झाला. पहिल्या तीन कसोटी सान्यात धमाकेदार खेळी करणाऱ्या ट्रॅविस हेडवर बॉक्सिंग डे कसोटीत शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली.
ऑस्ट्रेलियाकडून चौघांनी साजरी केली फिफ्टी, भारताकडून बुमराहनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स
मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहची जादू दिसली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची दमदार भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रवींद्र जडेजानं सलामीची जोडी फोडली. त्याने सॅम कोन्स्टास (Sam Konstas) ६० (६५) च्या रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. या सलामीवीराच्या पाठोपाठ उस्मान ख्वाजानंही अर्धशतकी खेळी केली. १२१ चेंडूत ५७ धावांची खेळी करणाऱ्या ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवत मेलबर्न कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपली पहिली विकेट मिळवली होती. वॉशिंग्टन सुंदरनं मार्नस लाबुशेनला ७२(१४५) धावांवर तंबूत धाडल्यावर ट्रॅविस हेड मैदानात आला. तो पुन्हा एकदा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. पण बुमराहनं क्षणता त्याला तंबूचा रस्ता दाखवत आपल्या खात्यात दुसरी विकेट जमा केली. ट्रॅविस हेडच्या रुपात ऑस्ट्रेलियानं चौथी विकेट गमावली. त्यानंतर बुमराहनं त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या मिचेल मार्शलाही ४ (१३) स्वस्तात माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला २४६ धावांवर पाचवा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन यांच्यासह स्मिथ या आघाडीच्या चारही फलंदाजांनी अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. स्मिथ अजूनही मैदानात तग धरून आहे.